पनवेल ः भारतील रेल्वे प्रशासनात कारकून या पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल २० जणांना गंडा घातल्याची घटना खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी नोंदविण्यात आली. या प्रकरणी खारघर पोलीसांनी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून सध्या हा भामटा फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारघरमध्ये राहणाऱ्या संबंधित भामट्याने दोन वर्षांपूर्वी (ऑक्टोबर २०२२) कबड्डी शिकविण्याच्या निमित्ताने सूशिक्षित व क्रीडा क्षेत्रातील तरुणांच्या पालकांना गाठले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि रेल्वेत कारकून म्हणून नोकरी लावतो असे भासवले. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने १० लाख रुपये द्यावे लागतील, असेही सांगितले. लगेच नोकरी लागेल या अपेक्षेने पालकांनी संबंधित ४३ वर्षीय भामट्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर या भामट्याने पालकांचा विश्वास दृढ होण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई चर्चगेट येथील रेल्वेच्या कार्यालयात पालकांच्या भेटीगाठी घेतल्या. रेल्वे कार्यालयातच भेट झाल्याने हा भामटा नोकरी लावेलच असा विश्वास पालकांना वाटल्याने त्यांनी भामट्याने दिलेल्या बॅंक खात्यावर आणि रोख रक्कम या भामट्याला दिली. त्यानंतर काही महिन्यांनी नोकरी कधी लागेल यासाठी भामट्याकडे विचारणा केली. मात्र तो अनेक कारणे देऊन नोकरी लावण्याचे टाळू लागला. अखेर पालकांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी या भामट्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याची सुरुवात केली.

हेही वाचा – बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज

हेही वाचा – परतीच्या पावसामुळे उरणमधील शेतीचे नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कबड्डी शिकविण्याचा प्रशिक्षक अशी स्वत:ची ओळख करणाऱ्या या भामट्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याची पत्नी व इतर चार जणांनी मिळून ही सर्व पालकांची फसवणूक झाल्याचे समजताच पालकांनी त्याच्याकडे दिलेले पैसे मागण्यासाठी पाठपुरावा केला. या भामट्याने स्वीकारलेल्या पैशातून त्याने कोल्हापूर येथील त्याच्या मूळ गावी घर बांधल्याचे पालकांना समजल्यावर पालकांनी भामट्याला दिलेले १ कोटी ३१ लाख रुपये परत मागण्याची सुरुवात केली. मात्र दिलेले पैसे परत मिळत नाहीत याची खात्री झाल्यावर खारघर पोलीस ठाण्यात पालकांनी एकत्र येऊन मार्च महिन्यात याविषयी तक्रारीअर्ज दिला. या अर्जाची पडताळणी केल्यावर पोलिसांना ही फसवणूक असल्याचे प्रथम दर्शनी दिसले. त्यामुळे सोमवारी याबाबत खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यापासून हा भामटा व त्याची पत्नी फरार असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे हे करीत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 people cheated on the name of clerk job in railways ssb