उरण पनवेल महामार्गावर गव्हाण फाट्याजवळ सकाळी साडेदहा वाजता दुचाकी आणि कंटेनरच्या भीषण अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सेजल अंबेतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघाता नंतर वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते, मात्र रुग्णालयात उपचारा दरम्यान सेजल यांचा मृत्यू झाला. सेजल या उरणमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास असून त्यांच मुळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आहे.
सेजल या वाशी येथे शिकवणीवर्गासाठी जात असताना हा अपघात घडला. त्यांना दुचाकी चालविण्याचा छंद होता. पदवीधर असणाऱ्या सेजल या दुचाकी स्वारीत प्राविण्य कमावलेल्या दुचाकी स्वार असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेल शहर पोलीसांनी अवजड वाहन रस्त्यावर इतर वाहनचालकांना अडथळा होईल या पद्धतीने उभे केल्याने हा अपघात झाल्याचे पोलीसांनी सांगीतले.