पनवेल : कळंबोली, खारघर आणि घणसोली या नोडमधील २१३ सदनिकांना सिडकोच्या महागृहनिर्माण सोडतीमध्ये सर्वाधिक मागणी आहे. सोडत जाहीर केल्यापासून १२०० इच्छुकांनी सोडतीमध्ये अर्ज नोंदणी केली. १२०० इच्छुकांनी अर्ज नोंदणी केली असली तरी उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती १ कोटी १३ लाख ते २ कोटी रुपयांपर्यंत असल्याने या उत्पन्न गटापर्यंतील अर्जदाराचे स्वत:चे एकही नवी मुंबईत घर नसावे या धोरणामुळे अनेक इच्छुकांची इच्छा असून सिडकोच्या या सोडतीमध्ये सहभाग घेता येत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. सिडको मंडळाने त्यांच्या पणन विभागातील काही धोरणामध्ये बदल करून काही नियमांना शिथिल करण्याची मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे.
सोमवारपासून (ता.२७ ऑगस्ट) नवी मुंबईतील कळंबोली, खारघर, घणसोली या उपनगरांमध्ये नोडमधील २१३ आणि सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर केली. या सोडतीचा निकाल १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
या सोडतीमध्ये कळंबोली, खारघर आणि घणसोली उपनगरातील २१३ सदनिकांपैकी ३८ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि १७५ सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.
हेही वाचा >>> बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर
आर्थिक दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना केंद्र सरकारचे दीड लाख व महाराष्ट्र सरकारचे एक लाख असे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार असल्याने सर्वाधिक अर्ज याच योजनेसाठी आले आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील उपलब्ध ६८९ सदनिकांपैकी ४२ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता, ३५९ सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, १२८ सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि १६० सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत.
व्हॅलीशिल्प सोसायटीमध्ये ९५.१८ चौरस मीटरच्या १३६ सदनिका सोडतीमध्ये असून चार खोल्या असलेली ऐसपैस सदनिकेची सिडकोची दोन कोटी पाच लाख रुपये एवढी किंमत आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील खारघर येथील सेलिब्रेशन सोसायटीमधील ७९.१८ चौरस मीटरच्या २३ सदनिका उपलब्ध आहेत. याची एका सदनिकेची किंमत १ कोटी १३ लाख ९३ हजार रुपये दर्शविण्यात आली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईत वीस लाखांचे हेरॉईन जप्त; तिघांना अटक, एका महिलेचा समावेश
मध्यम उत्पन्न गटाच्या सेलिब्रेशन सोसायटीमध्ये १० सदनिका असून ४३ चौरस मीटरच्या सदनिकांसाठी ६६ लाख रुपये सिडकोने दर्शविले आहेत. या सोडतीमध्ये उच्च उत्पन्न गटाच्या घरांच्या सोडतीमध्ये अल्प प्रतिसादानंतरच सिडकोचे संचालक मंडळ या सदनिकांच्या किंमती बाजारभावापेक्षा कमी करेल असे चित्र सिडकोच्या कारभारात दिसत आहे. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाने माहिती दिली नाही.
सिडको मंडळाने गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या महागृहनिर्माणामधील उपलब्ध सदनिकांच्या सोडतीला चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. बाजारभावाच्या तुलनेत सदनिकांची किंमत वाजवी असल्याने प्रतिसाद चांगला मिळतोय. – प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको महामंडळ
सिडकोची दूरध्वनी सेवा
खारघर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये पाण्याची समस्या असून या सोसायटीमध्ये सिडकोच्या ३५९ सदनिका विक्री होत असून ३४.३६ चौरस मीटरच्या सदनिकेसाठी ४६ लाख ४८ हजार रुपये सिडकोने सोडतीमध्ये दर्शविले आहेत. तसेच स्वप्नपूर्ती सोसायटीमधील ४२ सदनिका या २८.६३ चौरस मीटर क्षेत्राच्या असून त्यांची किंमत ३७ लाख रुपये आहे. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सिडकोने ०२२२०८७११८४ / ०७३१३ ६६८३९३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.