नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केट परिसराकडे तुर्भे विभागाकडून एकल प्लास्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात आली आहे. तुर्भे स्टोअर येथील राज मार्केटिंग यांच्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधित प्लास्टिक साठयावर कारवाई करण्यात आली आहे. गाळ्यावर अचानक धाड टाकत तब्बल २हजार ३८५ किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला व संबंधितांकडून पहिल्यांदा गुन्हा असल्याने ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
किरकोळ वापरातील प्लास्टिक प्रतिबंधासाठी कार्यवाही करण्याप्रमाणेच प्लास्टिकची विक्री व वापर रोखण्यासाठी आता महानगरपालिकेने प्रतिबंधातील प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या साठ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून सर्वच विभाग कार्यालयामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आलेल्या आहेत . यावेळी तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, कनिष्ठ अभियंता राज नागरगोजे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र रोडे, सिद्धू पुजारी, योगेश पाटील व सुरक्षारक्षक कामगार यांच्यासह ही धडक कारवाई पार पाडली. हा साठा जप्त करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशर मशीनव्दारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.