लोकससत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू केली होती. इतर खासगी शाळांच्या भरमसाठ फी भरून शिक्षण आवाक्या बाहेरचे असलेल्या पालकांना मात्र ही महापालिकेची सीबीएसई शाळा पसंतीस उतरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस याला प्रतिसाद वाढत आहे. यंदा नर्सरीच्या २४० प्रवेशासाठी एकूण १ हजार ११४ अर्ज दाखल झाले होते. सकाळी १० ते १वाजेपर्यंत ही सोडत सुरू होती.
यावर्षी प्रवेश घेण्यासाठी २५मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये ६७३ अर्ज दाखल झाले असून ५२१ पात्र ठरले आहेत तर सीवूडस शाळा क्रमांक ९३ मध्ये ४४२ अर्ज प्राप्त झाले असून ४१४अर्ज पात्र ठरले असून यापैकी २४० जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार होती. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ तसेच नेरुळ येथील शाळा क्रमांक ९३ या करिता प्रत्येकी १२० जागांची सोडत व्यवस्थित पार पडला आहे. नेरुळ येथील शाळेतील १किमी च्या नुसार १०४ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना आधी प्राधान्य देऊन सोडत काढली. तर कोपरखैरणे येथील शाळेत १ किमी परिघातील ७०, तर २ किमीतील ३० आणि ३ किमी परिसरातील २० विद्यार्थ्यांना निवडून सोडत काढण्यात आली.