नवी मुंबई शहरात अनंत चतुर्थीला गणरायांचे विसर्जन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात व अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आले. महापालिकेच्यावतीने श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. आजच्या गौरी गणराया विसर्जनामध्ये सर्वत्र प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात आज विसर्जन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच विसर्जन तलावावर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नियंत्रणाखाली व नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनखाली श्रीगणेशमूर्ती विसर्जन सुयोग्य रितीने पार पडले. नवी मुंबई महापालिकेने विसर्जनासाठी २२ नैसर्गिक व १३४ कृत्रिम अशा १५६ विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली होती. २१४ सार्वजनिक व ८३५५ श्रीगणरायाच्या मूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडल्याची माहिती पोलीस विभागाने दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती .
हेही वाचा : उरण पनवेल महामार्गावरील करळ ते जासई मार्गावर वाहतूक कोंडी
नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी या कृत्रिम विसर्जन तलावांवर विसर्जन करून पर्यावरणशीलता जपावी या पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत १३४ कृत्रिम तसेच नैसर्गिक तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. अखेरच्या दिवशी विसर्जन प्रसंगी ८५३३ घरगुती व २४१सार्वजनिक श्रीगणेश मूर्तींना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तर विसर्जनाचा सोहळा उशीरा पर्यंत सुरु होता.परिमंडळ १ व २ चे उपआयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, लाईफगार्डस् व अग्निशमन दल दक्षतेने कार्यरत असल्याचे चित्र होते. श्रीमूर्तींच्या व गौरींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची तसेच आवश्यक त्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था केली होती. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज होती. एकीकडे करोनानंतरच्या निर्बंधमुक्त वातावरणात आनंदाने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचा जोश सर्वत्र पाहायला मिळत होता.
हेही वाचा : एपीएमसीत बटाट्याच्या अवघ्या ४२ गाड्या दाखल ; वाहतूक कोंडीचा फटका
२२ मुख्य विसर्जन स्थळे व १३४ कृत्रिम तलाव अशा ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली . विसर्जनाच्या आजच्या दिवशी नवी मुंबईत करोनानंतर प्रथमच भर पावसात पुन्हा एकदा उत्सवाचा व उत्साहाचा जोश सर्वत्र पाहायला मिळाला. तर सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती. तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही अत्यंत सजगतेने वाहतूक व्यवस्थेचे व्यवस्थापन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गणरायांच्या विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली होती. पालिका आयुक्त बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आनंदी व भक्तीमय वातावरणात गणरायांना शांततेत निरोप देण्यात आला. करोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव व विसर्जन सोहळा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने झाला. – सुजाता ढोले,अतिरिक्त आयुक्त