पनवेल: नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने तळोजा परिसरातील एकटपाडा येथील एका इमारतीमध्ये धाड घालून मंगळवारी दुपारी २५ लाखांचा अंमली पदार्थाचा साठ्यासह तीघांना अटक केली. मागील अनेक महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

अंमली पदार्थाचा काळाबाजार नवी मुंबईत फोफावला आहे. यापूर्वी पोलीसांच्या पथकाने विविध कारवाईत लाखाे रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. तरीही अंमली पदार्थाचा काळाबाजार सूरुच आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उपायुक्त अमोल काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांना अंमली पदार्थाविरोधात सक्तीच्या कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश धुमाळ, श्रीकांत नायडु यांच्या पथकाला तळोजातील एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश काळदाते यांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करण्यासाठी एकटपाडा परिसरातील आय.जी. रेसीडेन्सी या इमारतीमध्ये सदनिका क्रमांक २०६ मध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पोलीसांनी धाड घातली. यावेळी एक नायजेरीयन व्यक्तीसह दोन पनवेलच्या दोन व्यक्तींना अंमली पदार्थासह पोलीसांनी ताब्यात घेतले. या धाडसत्रात पोलीसांना सव्वालाख रुपयांची मेफेड्रॉन पावडरसह, २१ लाखांचे कोकेन असे १२७ ग्रॅम अंमलीपदार्थ सापडले. या टोळीच्या मूख्यसूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.