नवी मुंबई – नवी मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गेल्या वर्षी गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने अल निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे या वर्षीही पाऊस लांबणार असल्याचा व तसेच पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे पालिकेने २८ एप्रिलपासून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा न करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विभागवार एक दिवसाच्या पाणीकपातीमुळे दिवसाला सरासरी २५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु तरीदेखील धरणात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करून अधिकची पाणीकपात टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : महापालिका सीबीएसई शाळांची लॉटरी येत्या गुरुवारी काढण्यात येणार
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात दिवसेंदिवस पाणीवापरामुळे पाणीसाठा कमी होतोय. धरणात अवघा ३७.९४ टक्के पाणीसाठा असून पुढील ९५ दिवस तो पुरेल एवढाच शिल्लक आहे. पालिकेने मागील काही दिवसांपासून विभागवार पाणीपुरवठ्यात संध्याकाळच्या एका वेळेचे पाणीकपात केल्यामुळे दिवसाला २५ एमएलडी कमी पाणी धरणातून घ्यावे लागत आहे. ५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाण्यासाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे. सध्या शहरात सुरू असलेली पाणीकपात आणखी वाढू द्यायची नसेल तर प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे,
यंदाही पाऊस हात आखडता घेणार असल्याची चिन्हे असल्याने जपून पाणी वापरायला हवे. सन २०२१-२२ मध्ये मोरबे धरणात ४२२९ मिमी पावसाची नोंद झाली तर सन २०२२-२३ मध्ये ३५७२ मिमी पाऊस पडला होता. स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जलसंपन्न महानगरपालिका अशी ओळख आज नवी मुंबई शहराची आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी या धरणातून प्रतिदिन ४८० एमएलडी पाणी उचलले जाते, तर प्रत्यक्षात नवी मुंबई शहराला ४०९ एमएलडी पाणीपुरवठा होतो. नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. सद्यःस्थितीला ३७.९४% पाणीसाठा असून ७३.५४ मीटर पाण्याची पातळी तर ७२.४२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा ९ ऑगस्टपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. नवी मुंबई शहरात पाणीकपातीला सुरुवात झाली असून आगामी काळात अधिक पाणीकपात टाळण्यासाठी नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा कमी केल्यामुळे दिवसाला २५ एमएलडी पाणीबचत
सध्या पालिकेने पाणीकपात सुरू केली असली तरी शहरात आठवड्यातून एक दिवस प्रत्येकी एका विभागाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा कमी केल्यामुळे दिवसाला २५ एमएलडी पाणीबचत होत आहे. तर दुसरीकडे जवळजवळ आठवडाभरात कुठेही पाणीतुटवडा जाणवला नाही. त्यामुळे पाणीबचतीबाबत सजग नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात लाकडी पेट्या, गवत; आग लागण्याच्या घटनेची पुनरावृत्तीची शक्यता
शहरात पाणीकपात सुरू झाली असली तरी विभागवार एका वेळच्या पाणीकपातीमुळे २५ एमएलडी पाणीबचत होत असल्याने पुढे अधिक दिवस पाणीपुरवठा करता येणार आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरून पालिकेला सहकार्य करावे. अरविंद शिदे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका