नवी मुंबई – नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या अधिक चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरीकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने वॉकॅबिलिटी वाढवण्यासाठी शहरात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध प्रकल्प राबवले जात आहेत. शहरातील नागरीकांच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने १ नोव्हेबर २०१८ पासून राबवलेल्या युलू सायकल व ई-बाईक्स प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, करोनाच्या काळात व त्यानंतर मात्र नागरीकांचा कल सायकलकडून ई-बाईक्सकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा नव्या जोमाने ई बाईक प्रणाली सुरू झाली असून, दुसरीकडे सायकलचा कमी वापर केला जात असल्याचे चित्र असून, युलू सायकलकडून शहरातील जवळजवळ २७४ सायकल महापालिकेला देण्यात आल्या असून त्या महापालिका शाळेत जाणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या शहरात २७४ सायकल व ३४६ नव्या ढंगातील ई-बाईक्स उपलब्ध आहेत. नवी मुंबईकरांचा युलू सायकल व ई बाईक्स प्रकल्पाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती सिडकोने नियोजनबद्धरित्या केल्यानंतर नवी मुंबई महापलिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम करण्यात आले आहे. शहरातील नागरीकांना चांगल्या भौतिक सुविधा देण्याबरोबरच शहरातील नागरीकांचे जीवनमान सुधारणे व त्यांना विविध योजना व प्रकल्पांद्वारे चांगल्या सुविधा देण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. शहरातील विविध ८ विभाग कार्यालयांतर्गत शहरातील रस्ते, दळणवळणाच्या सोयी व इतर सोयीसुविधा देताना देखणी व चांगली उद्याने पालिकेने केली आहेत. तसेच शहरात सुरू करण्यात आलेल्या युलू सायकल व ई बाईकला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – नवी मुंबई: महिला दिनी महिलांची जागृती व काव्य जागर

युलू सायकलप्रमाणेच युलू ई बाईकलासुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला असून, नव्या ढंगातल्या ई बाईक्स सर्वांना आकर्षित करीत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात तरुणाईकडून दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येत असून त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु या ई बाईकमुळे प्रदूषणालाही आळा बसत असून तरुणांमध्ये या त्यांना चालवण्यासाठीची उत्सुकता आहे. ज्यांनी याआधी युलू डाऊनलोड व रजिस्टर केले आहे त्यांना या नव्या ई बाईक्सचा वापर करता येत आहे. परंतु, करोनाच्या काळानंतर सायकलचा वापर कमी होत असून, ई बाईक्सचा वापर वाढला आहे. शहरात सायकल किंवा ई बाईक्स कोणाचाही वापर वाढला तर प्रदूषणात घट होतच आहे.

शहरात सुरवातीला युलू सायकल प्रणाली सुरू झाली तेव्हा ती बेलापूर व वाशी या परिमंडळ १ मध्येच २२ ठिकाणी सुरू झाली होती. त्यानंतर अनुक्रमे कोपरखैरणे निसर्ग उद्यान, तसेच ऐरोली येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात सुरू झाली. त्यावेळी सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. परंतु, रस्त्यावर धावणाऱ्या ई गाड्या वाढल्या असल्याने नागरीकांमध्येही ई बाईक्स चालवण्याकडे अधिक कल असल्याचे दुसून येत आहे. नवी मुंबई शहरातील सायकल वापरणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने संबंधित कंपनीने २७४ सायकल पालिकेला दिल्या असून, शाळेत येणाऱ्या गरजू व होतकरू मुलांना त्यांचे वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : होळीची वर्गणी कमी दिली म्हणून दोघांना जबर मारहाण; दुकानाचेही नुकसान

देशात ई बाईक प्रणालीचा शुभारंभ बंगळुरू या ठिकाणी प्रथम झाला. ई बाईक प्रणाली सुरू करणारे नवी मुंबई हे देशातील दुसरे, तर महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले होते. आता त्यात आणखीनच भर पडत असून, ई बाईक्सचा वापर अधिक केला जात आहे.

नागरीकांमध्ये सायकलपेक्षाही ई बाईक्सला अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या शहरात २७४ सायकल व ३४६ ई बाईक्स ठेवण्यात आल्या आहेत. परंतु सायकलचा वापर हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू सायकल कमी करून ई बाईक्सची संख्या वाढवण्यात येत आहे. परंतु, गरजू विद्यार्थ्यांना वापरता येतील अशा सायकल पालिकेला दिल्या असून, गरजू विद्यार्थ्यांना पालिकेच्यावतीने त्या दिल्या जातील, असे युलू ई बाईक्सचे व्यवस्थापक विकसा शिंदे म्हणाले.

२०१८ पासून आतापर्यंत जनसायकल प्रणालीची स्थिती

एकूण प्रवास – ४९ लाख २१ हजार ३१५ कि.मी फेऱ्या करण्यात पूर्ण

कार्बन क्रेडिट बचत – ४९ कोटी ६९ लाख ५ हजार ७७७ ग्रॅम कार्बन क्रेडीट प्राप्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 274 yulu cycle it will be given to the needy school students of navi mumbai mnc ssb