नवी मुंबई : एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत मागील आठवड्यात सर्व विभागीय कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली तसेच धडक कारवाई करीत दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ९० हजार रुपये दंडात्मक रक्कम तसेच २८ किलो ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महापालिकेकडून वारंवार जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहिमा राबविल्या जात आहेत. परंतू शहरात एकल वापर पिशव्यांचा सर्रास उपयोग केला जात आहे. सर्व विभाग कार्यक्षेत्रात एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून राबविल्या जात असतानाही एकल वापर पिशव्यांच्या उपयोगावर कधी नियंत्रण येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

अशा पालिकेच्या कारवाईत बेलापूर विभागात ४ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करीत २० हजार रुपये दंडात्मक रक्कम व ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहेत तर नेरूळ विभागात २ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करीत १० हजार दंडात्मक रक्कम व ४ किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती पालिकेकडून करण्यात आली आहे.

वाशी विभागातही ३ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये १५ हजार दंड वसूली व ३ किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. तुर्भे विभागात ३ व्यावसायिकांवरील कारवाईत १५ हजार दंडात्मक रक्कम वसुली आणि ८ किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक

कोपरखैरणे विभागातील कारवाईत १० हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि २.५ किलो प्लास्टिक साठा जप्ती २ व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. घणसोली विभागातून १ व्यावसायिकावर कारवाई करीत ५ हजार रक्कमेची दंडवसूली व १ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. शहरात आजही मोठ्या प्रमाणात एकल प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. ऐरोली विभागातही १० हजार दंडात्मक रक्कम आणि २ किलो ३०० ग्रॅम प्लास्टिक साठा २ व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आला आहे. याशिवाय परिमंडळ २ च्या भरारी पथकाने १ व्यावसायिकाकडून ९०० ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्ती आणि ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. अशा प्रकारे नवी मुंबई महापालिकेने ९० हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच २८ किलो ७०० ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य १८ व्यावसायिक आस्थापना यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने ही प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही एकल वापर प्लास्टिक वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

शहरात एकल वापर प्लास्टिकच्या कारवाईबाबत सातत्य असायला हवे. विविध उपनगरांत, बाजारपेठांमध्ये आजही खुल्या पध्दतीने एकल प्लास्टिक वापर होत असल्याने पालिकेच्या सातत्याने कारवाई झाली तरच एकल वापर प्लास्टिकवर निर्बंध येतील. – जिग्नेश पटेल, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai zws