रात्रीच्यावेळेस रस्त्याकडेला वाहन उभे करुन निवांत घरी झोपण्याचा विचार करीत असाल तर आपले वाहन सूरक्षित आहे का याचाही विचार करा. पनवेल शहरात वाहन चोरी ही मोठी समस्या बनली आहे. चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीनशे लीटर डिझेल वाहनातून चोरले आहे. या चो-या सोमवारी (ता.१७) आणि मंगळवारी (ता.१८) रात्री घडल्या आहेत. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीमध्ये अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात दिडशे लिटर डिझेल पोकलेन मशीनमधून चोरीस गेले होते. डिझेल चोरांची टोळी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याने पनवेल पोलिसांसमोर डिझेल चोरांना जेरबंद करणे हे आव्हान बनले आहे.
हेही वाचा- कोपरखैरणे हत्या प्रकरण : एक अटकेत, तीन आरोपी अल्पवयीन, सुधारगृहात रवानगी
कळंबोली परिसरातील घटना १३ ऑक्टोबरला पहाटेला मध्यरात्री साडेतीन वाजता घडली. किशोर खानावकर यांच्या पोकलेन मशीनचे काम सेक्टर ६ ई येथे सुरु असल्याने त्यांच्या मालकीची मशीन तेथे उभी होती. चोरट्यांनी त्यांच्या पोकलेनमधून दिडशे लीटर डिझेल आणि दोन बॅट-या चोरल्या. तर पनवेल तालुक्यामधील पाडेघर गावासमोर ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टसमोर प्रमोद धावरे यांनी त्यांच्या बसचे चाक (टायर) फुटल्याने बस उभी केली होती. रात्री एक वाजल्यानंतर चोरट्यांनी प्रमोद यांनी उभ्या केलेल्या बसच्या डिझेल टाकीतून २०० लिटर डिझेल चोरले. तर तिस-या घटनेत इम्रान खान यांनी त्यांच्याजवळील रुग्णवाहिका मंगळवारी (ता.१८) रात्री उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर उभी केली होती. त्यामधून शंभर लीटर डिझेल चोरी केले होते. या दोनही घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.