उरण : नवी मुंबई विमानतळ बाधीत गणेशपुरी गावातील ३३ टक्के मच्छीमार अजूनही पुनर्वसनापासून वंचित असल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. या उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बुधवारी करंजा येथे झालेल्या बैठकीत निर्धार करण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळबाधित दहा गावातील मच्छीमारांना पुनर्वसनाची अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र ती विमानातळ कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असतांनाही पूर्ण झालेली नाहीत. यात प्रामुख्याने पुनर्वसन करताना तयार करण्यात आलेल्या यादीत सुधारणा करून वंचित ३३ टक्के मच्छीमारांचा नव्या यादीत समाविष्ट करण्यात यावा. विमानतळबाधितांना खासगी विद्यालयात २० टक्के मोफत राखीव जागा ठेवावी, प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा, मच्छीमारांसाठी मत्स्यव्यवसायाशी निगडीत व्यवसाय सुरू करण्यासाठी सिडकोने नियोजन करावे, नवी मुंबई विमानतळात मच्छीमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखल देऊन नोकरीत सामावून घेण्यात यावे, गणेशपुरी गावासाठी मासळी बाजार उपलब्ध करून घ्यावा तसेच मच्छीमार सहकारी संस्थेसाठी भूखंड द्यावा आदी मागण्या सिडकोकडे करण्यात येणार आहेत.

‘लोकसत्ता’च्या महामुंबई अडव्हेंटज या वाशी येथील कार्यक्रमात फिशरमन काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधित मच्छीमारांचे पुनर्वसन प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर देशमुख यांनी या संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. याची चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी करंजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अमृत डोलकर,परशुराम डोलकर यांच्यासह अनेक मच्छिमार उपस्थित होते. या बैठकीत गणेशपुरी गावातील बाधित मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मच्छीमार गावाचे सध्या उलवे नोड मधील सेक्टर २५ मध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे. मात्र गेल्या चार वर्षानंतर ही घरांची बांधकामे अपूर्णच आहेत. त्यामुळे अनेकांना भाडयाने वास्तव्य करावे लागत आहे. तर येथील ग्रामस्थांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असून त्यांच्या बोटी किनाऱ्यावर लावण्यासाठी जेट्टी बांधण्याचे आश्वासन ही सिडकोकडून देण्यात आले होते. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायापासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी मच्छीमारांनी त्याग केला आहे. मात्र त्यांचे पूर्ण आणि योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे सिडको आणि शासनाकडे याचा पाठपुरावा केला जाणार असून लवकरच सिडकोसोबत बैठक होणार आहे. -मार्तंड नाखवा, राज्य अध्यक्ष, फिशरमन काँग्रेस</strong>