सत्तर हजार अर्ज प्रलंबित; मध्य प्रदेश,भोपाळ, बिहारसाठी विशेष रेल्वे गाडय़ा
नवी मुंबई</strong> : टाळेबंदीत शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून आतापर्यंत ३ हजार ६०० मजुरांचे स्थलांतर झाले आहे. गुरुवारीही परिमंडळ एक आणि दोन मिळून आठशेपेक्षा अधिक मजुरांना परवानगी देण्यात आली असून अद्याप ७० हजार अर्ज प्रलंबित आहेत.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी सुरू आहे. मात्र यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सरकारने निवारा केंद्र निर्माण करीत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला, मात्र या मजुरांनी त्यांच्या मूळ गावी जाण्याचे ठरविल्याने अनेक जण पायी प्रवास करीत आहेत. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून या मजुरांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करीत त्यांना परत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत आहे.
नवी मुंबईतून तीन दिवसांत मध्य प्रदेश,भोपाळ, बिहार, पाटणा या ठिकाणी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक फेरीत बाराशेप्रमाणे प्रवासी पाठविले जात असून आतापर्यंत ३,६०० जणांना पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत ३ हजार ६०० मजूर बिहार आणि मध्य प्रदेश येथे गेले असून अजून सुमारे ७० हजापर्यंत अर्ज प्रलंबित आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी आणि गाडय़ांच्या उपलब्धता यांचा समन्वय साधून त्यांनाही रवाना करण्यात येईल.
– सुरेश मेंगडे, उपायुक्त, विशेष शाखा