पनवेल ः वडोदरा मुंबई या महामार्गाच्या बांधकामाचा शेवटच्या पॅकेजचे (बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे गाव) ९.९८ किलोमीटर लांबीचे बांधकाम जोरदार सूरु असून या महामार्गात ४.१६ किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहे. यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या १५ महिन्यांत पुर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी समाजमाध्यमांवर दिली. ज्या कामाला २४ महिने लागतात तेच काम ९ महिन्यांपूर्वी झाले आहे. यासाठी ३०० कामगार, २० अभियंते दिवसरात्र एक करुन करत झटत आहेत. दूस-या बोगद्याचे काम ऑक्टोबर महिन्यात पुर्ण होईल. देशातील रस्ते बांधकामातील हा सर्वात लांबीचा (४.१६ किलोमीटर) बोगदा असून एकही अपघाताविना हा बोगदा झाले याचे समाधान या बोगदा खणणारे कामगार व अधिकारी व्यक्त करीत आहेत.
वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गामुळे १५ मिनिटांत पनवेलकरांना बदलापूरला जाता येईल. तसेच जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक यापूढे बदलापूर मार्गे सम्रुद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा महामार्गाने करता येणार असल्याने पनवेल, तळोजा, कल्याण येथील वाहतूकीचा निम्मा ताण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडोदरा मुंबई महामार्गाचे आरेखन केले आहे. भोज ते मोरबे या शेवटच्या पॅकेजचे १४०० कोटी रुपयांचे काम इरकॉन इंटरनॅशनल आणि जे. कुमार इन्फ्रा. प्रोजेक्ट या कंपन्या करत आहेत. शेवटच्या पॅकेजचे बोगद्यासह महामार्ग बांधण्याचे काम ४५ टक्के पुर्ण झाले आहे. दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचे काम पुर्ण खणून झाले असून उर्वरीत दूस-या बोगद्याचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे. या दोन्ही बोगद्याची मध्यभागाची उंची १३ मीटर आणि रुंदी २२ मीटर आहेत. ग्रीन फील्ड बोगद्यात वाहने मध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. या पद्धतीने बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. हे बोगदे खणण्यासाठी माथेरानच्या डोंगररांगामध्ये डोगरांला दिवसाला चार वेळा सुरूंग स्फोट घडवून आणले जात होते. स्फोटानंतर डोंगराला भेदून त्यातील ३ ते ४ मीटर लांबीतून निघणारा राडारोडा काढून त्यानंतर बोगद्याचे पुढील कामाची सूरुवात केली जात होती. हा बोगदा खणण्यासाठी स्वित्झर्लँड येथील बनावटीच्या यंत्रसाहीत्याचे जोडणी करुन ‘बूमर ड्रील जम्बो’ यंत्राच्या साह्याने दोन्ही बोगदे खणण्याचे काम सूरु आहेत. यंत्रासोबत चालक, ऑपरेटर, मजूर, मशीन सहाय्यक असे ३०० मजूर याच ठिकाणी दिवसरात्र दोन पाळ्यांमध्ये काम करतात. अजूनही दुस-या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सूरु आहेत. इरकॉन कंपनीचे अभियंत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व सुरक्षेचे नियम पाळून हे काम ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर कामगार व यंत्रणा करु शकलो याचे समाधान वाटते. स्फोटापूर्वी काम करताना परिसरात वन्यजिव दिसण्याच्या घटना घडल्या होत्या मात्र स्फोटाच्या आवाजानंतर वन्यजिव आढळले नाही. जेथे काम सूरु आहे त्यापासून काही अंतरावर मजूरांची राहणे व जेवणाची सोय कंपनीने केल्याने मजूरांचा वाहतूक खर्च व वेळेची बचत झाली. अनेक अभियंत्यांनी याच परिसरात वास्तव्य करण्याची तयारी दर्शविल्याने १५ महिन्यात एक बोगदा यशस्वीपणे खोदता आल्याचे समाधान वाटत असल्याचे अभियंत्यांनी सांगीतले.
हे ही वाचा… हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी
आठ मार्गिका असलेला सर्वाधिक लांबीचा हा बोगदा असून ठरविलेल्या मुदतीत बोगदा खणण्यासोबत हा बोगदा खणताना सर्व सूरक्षेचे नियम काम सूरु असलेल्या ठिकाणी पाळल्यामुळे एकही दुर्घटना घडली नाही ही बाब लक्षवेधक आहे. या बोगद्यानंतर महामार्ग रस्ते बांधणीचे महत्वाचे काम मार्गी लागले असून थेट पनवेल व बदलापूर काही मिनिटांवर जोडले जाणार आहे. दोन्ही बोगदे एकमेकांना लागूनच आहेत त्यामुळे एका बोदद्यात काही अडथळा झाल्यास वाहतूक दूस-या बोगद्यात वळविता येईल अशी रचना करण्यात आली आहे. बोगदा खणण्यापूर्वी बोगद्याचे दोन्ही बाजूकडील बिंदू जुळण्यासाठी सर्वे पथकाने जुळवून आणलेल्या कॉर्डिनेट्समुळे अचूक बोगद्याचा मध्य गाठता आला. – पी. डी. चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
हे ही वाचा… उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?
पुढील वर्षी जून महिन्यात या महामार्गाचे काम पुर्ण होईल. मात्र अजूनही मोरबे गाव ते कोन या दरम्यानचे विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे भूसंपादन ठप्प असल्याने वडोदरा दिल्ली मार्गिकेचे जलदकाम होऊनही दिल्लीहून येणारी कंटेनर वाहतूक मोरबे गावापर्यंतच येऊ शकेल, अशी स्थिती आहे. मोरबे गावाहून हा महामार्ग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार आहे. परंतू त्यासाठीचे भूसंपादन ठप्प झाले आहे. एमएसआरडीसी प्रशासन ही मार्गिका बांधत आहे. निधीअभावी एमएसआरडीसी कर्जरोखे उभारण्यासाठी आग्रही आहे.