डिसेंबरअखेर ४ हजार ४३ जणांची बोट सफर

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

गेल्या वर्षीपासून ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रातर्फे पक्षीप्रेमी, पर्यटक यांच्यासाठी सुरू केलेल्या बोट सफरला पक्षीप्रेमींनी पसंती दिली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत ४ हजार ४३ जणांनी ही सफर अनुभवली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक थंड वातवरण असल्याने फ्लेमिंगोसह इतर परदेशी पक्ष्यांचे आगमन लवकर झाले असून प्रमाणदेखील वाढलेले आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे खाडी ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी येत असतात. फ्लेमिंगो,पेंटट, स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर असे अनेक पक्षी येत असतात.

त्यामुळे ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रातर्फे पक्षीप्रेमींसाठी गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून बोटसेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी या पक्ष्यांचे आगमन लांबले होते व संख्याही रोडावली होती. यंदा मात्र ऑक्टोबरपासूनच परदेशी पाहुण्यांचे आगमण झाले असून संख्याही मोठी आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासूच ही बोटसेवा सुरू करण्यात आली आहे. पक्षीप्रेमी व पर्यटकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

२४ आसनी ‘एस बी फ्लेमिंगो’ बोट, तर एका विशिष्ट टीमसाठी प्रीमियम बोट उपलब्ध करून देण्यात येत आहे. या २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये ऐरोली ते वाशीपर्यंतच्या विभागात बोटींच्या दररोज भरती-ओहोटीनुसार दोन फेऱ्या होत आहेत. २४ आसनी बोटीतून प्रवास करण्यासाठी प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये तर प्रीमियम बोटीसाठी सात जणांच्या टीमला ६ हजार रुपये शुल्क  आकारले जात आहे.

नोव्हेंबर २०१८ पासून ही सेवा सुरू असून आतापर्यंत ४ हजार ४३ जणांनी बोट सफर केली आहे. तर डिसेंबरमध्ये ८५० जणांनी सफर केली आहे. ग्रुप बोटिंगला चांगली मागणी आहे.

यंदा परदेशी पक्ष्यांचे आगमन लवकर झाले आहे. तसेच संख्यादेखील वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात बोटिंगला सुरुवात केली असून केंद्राला भेट देण्याबरोबर बोटिंगला अधिक पर्यटक पसंती देत आहेत.

एम. एस. मोटे, वनविभाग अधिकारी

Story img Loader