उरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत हद्दीत दररोज  ४० टन कचरा जमा होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमी नसल्याने  रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. यामुळे हवेत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण शहर वगळता ग्रामीण भागातील लोकसंख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे. ही सव्वा लाख लोकसंख्या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये विखुरलेली आहे. या ३५ ग्रामपंचायतींमध्ये काही सधन तर काही आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट असलेल्या ग्रामपंचायतींकडे स्वच्छतेच्या कामासाठी सफाई कामगारांचीही वानवा आहेच. त्याशिवाय दररोज जमा होणारा कचरा वाहतुकीसाठी वाहनांची कमतरता भासत आहे.

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज साधारणपणे ४० टन कचरा जमा होतो. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, ओल्या-सुक्या कचऱ्याचा समावेश असतो. दररोज जमा होणारा कचरा जमा करण्यासाठी काही ग्रामपंचायतींकडे कचरा कुंडय़ांच नव्हे तर वाहतुकीची साधनेही नाहीत. मात्र काही ग्रामपंचायतींकडे कचराकुंडय़ा, घंटागाडय़ा, ओला-सुका कचरा वाहून नेण्यासाठी बंदिस्त कचरा गाडय़ाही उपलब्ध आहेत. मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचराभूमीच नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जात आहे. कधी खाडी किनाऱ्यावरील खारफुटी, कांदळवनावर तर गावाबाहेरच्या एखाद्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. काही ग्रामपंचायतींकडे कचरा टाकण्यासाठी पर्यायच उपलब्ध नसल्याने कचरा जाळून नष्ट केला जात आहे.

तालुक्यातील एकदोन ग्रामपंचायतीने हद्दीतील कंपनीचे आर्थिक साहाय्य घेऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी केली आहे.

जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरील तीनही गावांपेक्षा समुद्रातून किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण अधिक आहे.

घनकचऱ्याची बेटावरच विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने एमटीडीसी, जिल्हाधिकारी, जेएनपीटी आदी विविध शासकीय विभागांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिकचा कचरा रिसायकिलग करण्यासाठी ठाण्यात पाठविण्यात येत असल्याची माहिती सरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

प्रकल्प कागदावरच

तालुक्यात कचराभूमीसाठी सिडकोने बोकडवीरा, नवघर, डोंगरी, नागाव, पागोटे या ठिकाणी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून कचराभूमी प्रकल्प फक्त कागदावरच आहे. सिडकोच्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमीची नितांत आवश्यकता आहे. त्याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वच्छता व कचरा वाहतुकीसाठी एक घंटागाडीची गरज आहे. सध्या २२ घंटागाडय़ा आहेत. सफाई कामगारांची कमतरता आहे. ग्रामस्वच्छतेसाठी या बाबी उपयुक्त आहेत. कचराभूमीसाठी ग्रामपंचायतीकडून नव्याने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 – महेश घबाडी, विस्तार अधिकारी, उरण पंचायत समिती

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 tons of garbage is being dumped on the roads in the uran taluka zws