संतोष जाधव
नवी मुंबई- नवी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून पावसाला सुरवात झाली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरापेक्षा शहरात अधिक पाऊस पडत आहे. नवी मुंबईत यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षीही मोरबे धरण पूर्ण भरलेले नसल्याने यावर्षी शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरण्यासाठी ४५०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. तसेच शहरात सद्या सुरु असलेली पाणी कपात सुरुच राहणार असल्याची पण अतिरिक्त पाणीकपात करणार नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
नवी मुंबई शहरात धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने व राज्यशासनाच्या पाण्याबाबतच्या उपाययोजनानुसार २८ एप्रिलपासूनच पाणीकपात सुरु आहे.विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा केला जात नाही. तर दुसरीकडे मुंबई शहरात पावसाला सुरवात झाली असली तरी पाण्याबाबत खबरदारी म्हणून येत्या शनिवारपासून मुंबई शहरात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.तर नवी मुंबई महापालिकेनेही पाणीकपात तात्काळ रद्द न करता पुढे होणाऱ्या पावसावर पाणीकपात थांबवायची का नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नवी मुंबई शहरात यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा असली तरी नवी मुंबई शहरात पडलेल्या पावसापेक्षा मोरबे धरण परिसरात आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत ४६१.९७ मिमी तर मोरबे धरण परिसरात ३५७.८० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात अधिक तर धरणात कमी पाऊस पडत आहे. पावसाला नुकतीच सुरवात झाली असली तरी पावसाला उशीरा सुरवात झाल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही धरण भरेल की नाही अशी काळजी पालिका प्रशासनाला वाटत असून आतापासूनच पाणीबचतीबाबत व पाणीपुरवठ्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मोरबे परिसरातही चांगला पाऊस पडत आहे.गेली २ वर्ष धरण पूर्ण भरले नाही त्यापूर्वी सलग ३ वर्ष मोरबे धरण भरले होते.परंतू सद्या पावसाची सुरु असलेली जोरदार बॅटींग पाहता यंदा धरण भरेल अशी अपेक्षा नवी मुंबईकर नागरीक व्यक्त करत आहेत.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱे मोरबे धरण २०२० पूर्वी २०१७ ते २०१९ सलग तीन वर्ष भरल्याने हॅटट्रीक साधली होती. दुसरीकडे मोरबे धरण परिसरात मागील ९८ वर्षानंतर प्रथमच २०१९ मध्ये जवळजवळ ५०००मिमी.पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती.परंतू मागील २ वर्षात मोरबे धरण परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून ८८ मीटर पातळीला धरण पूर्ण भरते. यावर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडत असला पुढील दोन महिन्यात पावसाने कसर भरुन काढण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न आहे.मोरबे धरणात व शहरात मागील काही दिवसापासून पावसाला सुरवात झाली असून यंदा मोरबे धरण पूर्ण भरण्यासाठी अजून ४५०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेली पाणीकपात रद्द करण्यात येणार नाही व अतिरिक्त पाणी कपात करणार नाही. पाणीपुरवठा नियोजनाबाबत व मोरबेतील पाणीसाठ्याबाबत आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहे.-राजेश नार्वेकर ,आयुक्त
धरण पातळी ८८.२० मीटरला धरण पूर्ण भरते.
आजची धरण पातळी-६८.८३ मीटर
गेल्यावर्षी धरणात पाणीसाठा- २७.५६ टक्के
आज धरणात पाणीसाठा –
२४.७० टक्के
मोरबे धरणात मागील काही वर्षात पडलेला पाऊस
२०१८ – ३३२८.२०मिमी.
२०१९ – ५२५१.२०मिमी.
२०२० – ३३६९ मिमी.
२०२१ – ४१०१.८० मिमी.
२०२२ – ३६०० मिमी.
२८ जून २०२३ पर्यंत-३५७.८० मिमी