नवी मुंबई – नवी मुंबईकरांसाठी यंदा आनंदाची बातमी असून मोरबे धरण ९१ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. धरणात पुढील ३२० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाला असून ५०० मिलीमीटर पाऊस पडल्यास मोरबे धरण शंभर टक्के भरेल. परंतु मोरबे परिसरात पावसाचे प्रमाण कमी राहिले तर शहराला पाणीपुरवठ्यासाठी दिवसाला लागणाऱ्या ४६५ दशलक्ष लीटर पाणी उपशामुळे मोरबे धरण भरण्यासाठी अधिक पावसाची आवश्यकता लागेल अशी स्थिती आहे.
जून महिन्यात पावसाने हात आखडता घेतला, परंतु जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात २३ जूनपर्यंत फक्त ३३ दिवस पाणीपुरवठा करता येईल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. परंतु मागील महिनाभरात मोरबे धरणाच्या व माथेरानच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून मोरबे धरणात पुढील वर्षी २१ जून २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात माथेरानच्या डोंगररांगामध्ये काही दिवसांतच ४००० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत २७४१ मिमी. पाऊस पडला आहे.
हेही वाचा – पनवेल पालिकेचे गोदाम चोरांनी लुटले
नवी मुंबई मोरबे धरण परिसरात सव्वा महिन्यात तब्बल २७४१.८० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्यावर्षी आतापर्यंत २११२ मिमी पावसाची नोंद झाली होती. मोरबे धरण हे ८८ मीटरला १०० टक्के भरते. धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे धरण भरणार का याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – कंटेनरमुळे चिर्लेत वाहतूक कोंडीत वाढ
मोरबे धरणात चांगला पाणीसाठा झाला असला तरी पावसाने उघडीप घेतली आहे. पुढील काही दिवसांतच ५०० मिमी पाऊस पडला तर धरण नक्की भरेल. धरणात चांगला पाणीसाठी निर्माण असला तरी वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत पालिका नियोजनबद्ध व योग्य ती खबरदारी घेत आहे. – संजय देसाई, शहर अभियंता