पनवेल: पनवेल तालुक्यामध्ये हत्तीपाय रोगाचे ५२ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात २५ तसेच ग्रामीण पनवेलमध्ये २७ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवीन पनवेल परिसरामध्ये तीन आणि नावडे गावात एक असे चार रुग्ण पालिका क्षेत्रात नव्याने बाधित झाल्याची नोंद आहे. महापालिकेने सध्या घरोघरी आरोग्य सेवकांच्या मार्फत सर्वेक्षण करुन हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही शोधमोहीम राबविली आहे.   १३ लाखांवर पनवेल तालुक्याची लोकसंख्या आहे. त्यापैकी महापालिका क्षेत्रात १० लाख लोकसंख्या आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रोहिंजन, पेणधर या गावांसह, पनवेल शहर कोळीवाडा आणि तळोजा पाचनंदनगर परिसरात सर्वाधिक हत्तीपाय रोगावर उपचार घेत असलेले रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहेत. 

हत्तीपाय बाधित रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केले जात असून या रुग्णांवर होणा-या शस्त्रक्रियेसाठी पालिकेकडून सहकार्य केले जाणार असल्याचे पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगीतले. हत्तीरोग हा एक दुर्लक्षित असा आजार असून यामध्ये हात्तीपाय व अंडवृद्धी ही लक्षणे दिसून येतात. हे दोन्हीं आजार सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. हत्तीपाय रुग्णामध्ये एका ठराविक वृद्धीनंतर रुग्णाच्या हालचालीवर कमालीची बंधने येतात. रुग्ण मुक्तपणे हिंडू फिरू शकत नाही. अंडवृद्धी या आजारासाठी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून या आजाराचे प्रमाण निश्चित कमी करता येते.

हेही वाचा >>>कांदा, बटाटा ,पाणी कपात विरोधात माथाडी, व्यापारी आक्रमक; नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा

हत्तीपाय आजार असलेल्या रुग्णांना पायावर सूज येऊन पायाच्या तसेच रुग्णाच्या हालचालींवर र्निबंध येतात, रुग्ण इतरांच्या मदती शिवाय हालचाल करू शकत नाहीत. त्यामुळे रुग्णाला एक प्रकारचे अंपगत्व प्राप्त होत असते. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून अशा रुग्णांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते.