उरण : बुधवारी बुडालेल्या प्रवासी बोटीला अपघात होताच जवळच असलेल्या जेएनपीए बंदरातील पायलट (मोठी जहाजे बंदरात ने – आण करणाऱ्या बोटी) बोटींनी क्षणाचाही विलंब न करता प्रथम धाव घेत अपघातानंतर बुडणाऱ्या ५६ प्रवाशांना वाचविण्यात आले आहेत.
त्यामुळे जेएनपीए मधील पायलट बोटीचे कॅप्टन अनमोल श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले जात आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून जेएनपीए अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश देत आवाहन केले होते. त्यानंतर बचावलेल्या प्रवाशांवर जेएनपीए रुग्णालयात उपचार करून त्यांच्या नातेवाईकासह सुखरूप घरी पोहचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हेही वाचा >>>जलप्रवास धोकादायक स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस प्रवासी बोटींच्या मुळावर
गेटवे ऑफ इंडिया वरून घारापुरी लेणीकडे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने सराव सुरू असताना टक्कर दिली. ही घटना घडत असताना तेथे आसपास जेएनपीएची पायलट बोट स्पीडबोटीजवळ होती. जेएनपीएचे पायलट अनमोल श्रीवास्तव यांनी क्षणाचा विलंब न लावता बचावासाठी धाव घेऊन मदत केली. त्यानंतरजेएनपीएच्या इतर पायलट बोटींना बोलवून घेत मदत करीत अपघातग्रस्त बोटीतून ५६ प्रवाशांचा जीव वाचविला. जेएनपीएकडून अपघातग्रस्तांची योग्य व्यवस्था करून उपचार घेतलेल्या सर्व नागरिकांना बसने त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले. यावेळी जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील व रवींद्र पाटील यांनीही सहकार्य केले.
आमच्या सागरी विभागाच्या चमूच्या सतर्कतेमुळे नौदल कर्मचाऱ्यांसह, ५६ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. या बचावकार्यात आमच्या पायलट बोटीने आजूबाजूला महत्त्वाची भूमिका बजावली. वाचविण्यात आलेल्या प्रवाशांना तातडीने जेएनपीए रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना शक्य तितकी सर्वोत्तम वैद्याकीय सेवा देण्यात आली. –उन्मेष वाघ, अध्यक्ष, जेएनपीए