Accident News : अपघाताच्या प्रसंगी प्रवाशाच्या सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग लावल्या जातात. मात्र नवी मुंबईच्यावाशी येथे कारमधील याच एअरबॅगमुळे एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी झालेल्या या दुर्गघटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव हर्ष असून त्याचे वडील कार चालवत होते. त्यांच्या गाडीच्या समोर चालत असलेली एसयूव्ही डिव्हायडरला धडकली आणि हवेत उडून मागच्या कारच्या बॉनेटवर आदळली. याप्रकरणी एसयूव्ही चालक कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद पचाडे (४०) यांच्यावर बेजबाबदारपणे गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा हर्ष याच्या शरीरावर कुठलीही जखम नव्हती. मात्र डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला की पॉलीट्रॉमामुळे (शरीरावर एकापेक्षा जास्त जागी इजा होणे) धक्का बसून आणि रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असेल. . कारमध्ये हर्षबरोबर त्याचे तीन लहान भावंडे आणि वडील देखील प्रवास करत होते, ज्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर डॉ. पचोडे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या अपघातानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. एअरबॅग सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, परंतु काहीवेळा त्याच्यामुळे चेहरा आणि पोटाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे १३ वर्षांखालील मुलांना पुढच्या सीटवर बसू देऊ नये असा सल्ला दिला जातो.

नेमकं काय झालं?

मृत मुलाचे वडील हे स्टेशनरीचे दुकान चालवतात आणि त्यांच्या भावाबरोबर वाशी येथे राहातात. शनिवारी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर मुलगा हर्ष आणि त्यांच्या पुतण्यांनी पाणीपुरी खाण्याचा हट्ट धरला. तेव्हा ते त्यांची हॅचबॅक कार घेऊन बाहेर पडले. यावेळी हर्ष हा कारमध्ये पुढच्या सीटवर बसला होता आणि इतर मुले मागे बसली होती.

हर्षचे वडील मावजी अरेथिया यांनी सांगितले की, रात्री साडेअकरा वाजता आम्ही सेक्टर २८मधील ब्लू डायमंड हॉटेल जंक्शनजवळ पोहोचलो तेव्हा आमच्या पुढे चालणाऱ्या एसयूव्हीचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला धडकली. मी त्याच्या खूप जवळ होतो, मी ब्रेक दाबला, पण एसयूव्हीचा मागचा भाग हवेत ६ ते ७ फूट उडून मा‍झ्या कारच्या बॉनेटवर कोसळला. माझ्या कारमधील एअरबॅग लगेच उघडल्या.

दरम्यान वाशी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दीपक गावित यांनी सांगितले की, एअरबॅग धडकल्यानंतर हर्ष बेशुद्ध झाला. महापालिकेच्या रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की डॉ. पचाडे हे घटनास्थळावरून पळून गेले नाहीत ते आपला जबाब देण्यासाठी वाशी पोलीस स्टेशनला गेले. सोमवारी पुन्हा त्यांना बोलवण्यात आले. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत आवश्यक आसलेली नोटीस देण्यात आली. तसेच त्यांना सहकार्य करणे आणि आरोपपत्र दाखल होताना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader