नवी मुंबई: नवी मुंबई आणि परिसर ही तिसरी नवी मुंबई समजली जात असून देशाच्या ६५ टक्के डेटा सेंटर क्षमता ही नवी मुंबईत असल्याने हे शहर डेटा सेंटर हब बनत आहे. नवी मुंबईत महिला सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटक म्हणून आलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांनी राज्यात महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील नेरुळ येथील सावली इमारतीत महिला सुरक्षा प्रकल्प उभा करण्यात आला असून याच इमारतीत सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विमानतळ व ट्रान्स हार्बर मार्ग झाल्यानंतर नवी मुंबई परिसरात मोठी गुंतवणूक वाढणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचेही महत्त्व वाढणार असल्याने पोलिसांनी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अद्ययावत होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आज मितीस मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर असून कुठेही, कधीही महिला एकट्या फिरू शकतात.

हेही वाचा… नवी मुंबईत दोन ठिकाणी बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध होणार

महिलांवरील बलात्कार प्रकरणांत ९० टक्के हे नातेवाईक वा परिचित व्यक्तीच आरोपी असतात, मात्र अब्रू जाईल या भीतीने ही प्रकरणे घरातच दाबली जातात. दिल्लीत घडलेल्या दुर्दैवी निर्भया प्रकरणानंतर महिला धाडस करीत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत आहेत. तक्रारदार महिला पुढे येऊ लागल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरीही गुन्हेगारांवर जरब बसवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचेही ते म्हणाले. एका युनिटपुरते मर्यादित असलेले सायबर युनिट; आता सायबर पोलीस ठाणी सुरू करावी लागली. हे पोलिसांपुढे आव्हान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याच उद्देशाने निर्भया पथक ही संकल्पना राबवली जात असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा… नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ लाखांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणार; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचीही मिळाली परवानगी 

सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांनीदेखील नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षेच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच या प्रकल्पाची माहिती देताना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले, सदर पथकात १० आर्टिगा, ४० दुचाकी असून अजून १० आर्टिगा घेण्यात येणार आहेत. महाविद्यालय परिसरात गस्त, महिला ज्या ज्या भागात स्वतःला असुरक्षित समजतात त्या ठिकाणी गस्त वाढवणे, असे उपाय केले जाणार आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस चालक, वाहकाला मारहाण

नवी मुंबईत ११२ क्रमांकाचा प्रतिसाद (रिस्पॉन्स) सरासरी सव्वापाच मिनिटे असून त्यात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच सर्व पोलीस ठाण्यांत महिला कक्ष स्थापन केला आहे. या प्रसंगी आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर आणि पनवेल मनपा आयुक्त देशमुख आदी उपस्थित होते.

सावली महिला सुरक्षा केंद्र इमारतीत तळमजल्यावर स्वागत कक्ष आणि समुपदेशन केंद्र आहे तर पहिल्या माळ्यावर सायबर पोलीस ठाणे असून तेथेही सायबर गुन्ह्यासंबंधी महिलासाठी समुपदेशन केंद्र आहे. याशिवाय दुसऱ्या माळ्यावर महिला आश्रय केंद्र आहे. येथे अचानक बेघर झालेल्या महिलांना राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. या केंद्रासाठी निर्माता- दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मदतीतून गाड्या दिल्या गेल्याचे आयुक्त भांबरे यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 percent of the countrys data is in navi mumbai said by devendra fadnavis dvr
Show comments