लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय सात शाळा सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना केले आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात येते. पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सूचना केल्याप्रमाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा तपासण्याची मोहीम राबवली. या मोहीमेमध्ये तळोजा परिसरामध्ये ६ आणि कळंबोलीत एक शाळा विना परवानगी सुरू असल्याचे आढळले. संबंधित अनधिकृत शाळांविरूध्द दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
पालकांना आवाहन करतो की आपल्या पाल्याचे प्रवेश या शाळांमध्ये करू नयेत. जर या शाळांमध्ये अगोदरच प्रवेश झाले असतील तर ते प्रवेश अधिकृत शाळेत होण्यासाठी इतर नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजन करण्यात येईल. यानंतर देखील काही अनधिकृत शाळा आढळून आल्यास त्यांची नावे घोषित करून त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका
अनधिकृत शाळांची यादी
- मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल, ओवे,
- काळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल, तळोजा पाचनंद
- अर्कम इंग्लिश स्कूल, तळोजा
- ओशीन ब्राईट कॉनव्हेंट स्कूल, तळोजा
- ऑक्सफोर्ड इंग्लिश मिडियम स्कूल, कळंबोली
- बजाज इंटरनॅशनल स्कूल, तळोजा
- दि वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल, तळोजा
पालकांनी अशा शाळेत आपल्याला पाल्यांना प्रवेश घेऊ नये तसेच त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या इतर मान्यता प्राप्त शाळेत समायोजन करण्यात येईल असेही पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.