नवी मुंबई शहरात सर्वसामान्यांसह तरुणांसाठी आवश्यक असणारी खेळाची मैदाने दुर्लक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरातील सिडकोमार्फत खासगी शाळांना दिलेली मैदाने खासगी शाळांनी आपल्याच ताब्यात घेतली आहेत. पालिकेची खेळाची मैदाने खेळाच्या अनुषंगाने विकासात्मक बदलासाठी आगामी काळात ती क्रीडा उपायुक्तांकडे दिली जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, खेळाच्या अनुषंगाने त्यामध्ये विकासात्मक बदल करता येणे शक्य होणार आहे. याबाबत नुकतीच पालिका आयुक्तांसह संबंधित विभागाची बैठक झाली असून याबाबत लवकरच कार्यवाही होणार आहे.
नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा या ८ विभाग कार्यालयांतर्गत शहरात ७८ खेळाची मैदाने आहेत. पालिकेने शहरात राजीव गांधी स्टेडियमसह यशवंतराव चव्हाण क्रिडांगण अशी अनेक मैदाने खेळासाठी विकसित केली आहेत. तर अनेक मैदानांवर वाढलेले गवत, मैदानावर असलेले खाचखळगे पाहायला मिळतात. शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असताना खेळाची मैदाने मात्र पालिकेकडून दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. अनेक मैदानावर गवत वाढलेले आहेत. त्यामुळे मुलांनी खेळायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. खेळाच्या मैदानाबाबत पालिकेने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरात सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेतच उद्याने खुली केली जात आहेत. तर नवी मुंबईत विविध खेळांना प्राधान्य आहे.
स्थानिक पातळीवर विविध खेळाबरोबरच क्रिकेट खेळालाही महत्व आहेत. नवी मुंबईतील फोर्टी प्लसचे सामने शहराबाहेरही खेळवले जातात. स्थानिक गावांमध्ये क्रकेटला खूप महत्व आहे. त्यामुळे शहरभर विविध सामने भरवले जात असताना इतर खेळांसाठीही सोयीसुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने क्रीडा विभागामार्फत सुचवलेले काम होणे आवश्यक आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेची मैदाने ही विभाग अधिकारी यांच्याकडे असतात. देखभाल दुरुस्तीची कामे अभियंता विभागाच्या मदतीने केली जातात. परंतु, आता पालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शहरातील खेळांच्या मैदानाचा खेळासाठी विकासात्मक बदल करण्यासाठी सर्व मैदाने आगामी काळात क्रीडा उपायुक्तांकडे दिली जाणार आहे. त्यांच्या सुधारणांची जबाबदारी क्रीडा विभागामार्फत होणार आहे.
नवी मुंबई शहरात असलेली खेळासाठीची अनेक मैदाने खाजगी शाळांच्या ताब्यातही आहेत. एकीकडे नियमानुसार व सिडकोच्या करारानुसार ही मैदाने शाळेच्या वेळाव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे आवश्यक असताना खासगी शाळांनी मनमानीपणे सार्वजनिक मैदाने आपल्याच हक्काची असल्याच्या अविर्भावात मौदानांना कुंपन घालून ती कुलूपबंद केलेली आहेत. त्यामुळे, सर्सामान्य मुलांना खेळासाठी सार्वजनिक मैदानांचा सर्वसोयीसुविधांनी युक्त बदल करण्यासाठी ती क्रीडा विभागाकडे दिली जाणार आहेत.
शहरातील अनेक खेळाच्या मैदानांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. अनेक खेळाची मैदाने पार्किंगची ठिकाणे, तर अनेक मैदानांवर वाढलेले गवत पाहायला मिळते. पावसाळ्यानंतर दिघा ते ऐरोलीपर्यंतच्या मैदानांमध्ये सोयीसुविधांबाबत बदल पाहायला मिळतात. परंतु, यापुढे पालिकेच्या क्रीडा विभागाच्या अनुषंगाने यामध्ये बदल होणार आहेत. आगामी काही दिवसांतच महापालिकेचे आर्थिक अंदाजपत्रकही सादर होईल. दरवर्षीप्रमाणे खेळासाठीही आर्थिक तरतूद करण्यात येते. त्यामुळे, शहरातील मैदाने आगामी काळात अधिक चांगली होण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई शहरातील सार्वजनिक खेळाची मैदाने ही विभाग कार्यालयाकडे असतात. विभाग कार्यालयामार्फत असलेल्या अभियंता विभागाच्या अधिपत्याखाली तेथील देखभाल व दुरुस्ती विकासात्मक कामे केली जातात. आता ती क्रीडा उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. त्यामुळे आता क्रीडा विभागासाठी विशेष अभियंते मिळाल्यास अधिक गतीने ही कामे करता येणार आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेली सार्वजनिक मैदाने ही क्रीडा विभागाकडे घेण्याबाबत पालिका आयुक्तांनी सूचित केले आहे. त्यामुळे, ही मैदाने विकासात्मक कामासाठी, तसेच तेथील खेळांच्याबाबत बदलांसाठी क्रीडाविभागामार्फत आगामी काळात बदल करण्यात येणार आहेत. खेळाच्या मैदानाबाबत चांगल्या सुधारणा करण्यात येतील, नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी सांगितले.