उरण : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नगरपरिषदेचे विमला तलाव हे उद्यान आहे. या उद्यानात नगरपरिषदेने सुरक्षेसाठी बसविलेले सीसीटीव्ही गायब झाले आहेत. मात्र याकडे नगर परिषदे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही यंत्रणाच ठप्प झाली आहे. त्यामुळे उद्यानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : तुर्भेकरांनी आंदोलनाचा इशारा देताच पादचारी पूल बांधण्याची लगबग
उरण नगरपरिषदे ने उभारलेल्या विमला तलावात असलेल्या उद्यानात ज्येष्ठ नागरीक, महिला मॉर्निग वॉक व विरंगुळ्यासाठी येतात. त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या वतीने उद्यानात मुलांसाठी खेळणी बसविली आहेत. त्यामुळे लहान मुलं ही खेळण्यासाठी या उद्यानात येतात. तर विमला तलाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी व शहरातील नागरीक या उद्यानातून ये जा करतात. या उद्यानात रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार सुरू असतात त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानातील गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी उरण नगर परिषदेने सीसीटीव्ही बसविले होते. त्यासाठी एक नियंत्रण कक्ष ही उभारला होता. मात्र या सीसीटीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्याचे स्टँड सडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेले कॅमेरे गायब झाले आहेत. या संदर्भात उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर उरण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत १६ पैकी ८ सीसीटीव्ही गायब असून ८ कॅमेरे शिल्लक आहेत. त्याच्या केबलही गायब आहेत. तर संपूर्ण यंत्रणा बंद झाली असल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.