पाणीचिंता मिटली; ७ जून २०२१ पर्यंत पुरेल एवढा जलसाठा

नवी मुंबई : गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या मोरबे धरणात या वर्षी ऑगस्ट महिना संपला तरी ८२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. हा साठा नवी मुंबईकरांना ७ जूनपर्यंत पुरेल इतका असल्याने पाणीचिंता मात्र मिटली आहे.

मोरबे धरणात गेल्या वर्षी ५२५१.२० मिलिमीटर  एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद  झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक साठा झाला होता. ४ ऑगस्ट रोजीच धरण भरले होते. मागील तीन वर्षे धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. या वर्षी पावसाने थोडी ओढ दिल्याने अद्याप धरणात ८२ टक्केच साठा झाला आहे. जून व जुलैपेक्षा धरण परिसरात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला व आताही सुरू आहे. त्यामुळे धरण या वर्षीही भरण्याची शक्यता आहे. यासाठी ११०० मिमी.पावसाची आवश्यकता आहे.

पावसाला सुरुवात झाली तेव्हा धरणात फक्त ४० टक्के पाणीसाठा म्हणजेच ६८.१६३ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक होते. सद्य:स्थितीत धरणात १५६.४८७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते.

उपलब्ध साठय़ातून ७ जून २०२१ पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर  यांनी केले आहे.

धरणातील आजची स्थिती

* आजची धरणाची पातळी— ८१.९७ मीटर

* नवी मुंबई शहर परिसरात पडलेला एकूण पाऊस : २४५४.७४ मिमी.

* मोरबे धरण परिसरात पडलेला एकूण पाऊस : २२०९.४० मिमी.

* धरणात ७ जून २०२१ पर्यंत पुरेल एवढा जलसाठा

* धरण भरण्यासाठी अजून १७०० मि.मीटर पावसाची आवश्यकता.

Story img Loader