नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या पामबीच मार्गालगत ७.२ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आता चांगलाच वादात सापडला आहे. या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हव्या त्या पध्दतीने त्यामध्ये बदल करण्यात येत असल्याचे चित्र असून कागदावर या सायकल ट्रॅकची रुंदी ३.५० मीटर असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या सायकल ट्रॅकची रुंदी अगदी २.५० मीटर आहे. तर दुसरीकडे हायकोर्टाची परवानगी काम सुरु करण्यापूर्वी घेणे आवश्यक असताना अद्याप या सायकल ट्रॅकला हायकोर्टाची परवानगीच मिळाली नसून पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे पालिकेचा सायकल ट्रॅक अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : रस्त्यावर फुटपाथचे अतिक्रमण; सौंदर्यीकरणाच्या नावाखाली ढिसाळ काम
नवी मुंबई महापालिकेने सायकलप्रेमींसाठी पामबीच मार्गालगतच्या समांतर रस्त्यालगत सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. प्रशासकाच्या काळात करोडो रुपयांचे प्रस्ताव पास करुन पालिका अधिकारी सामान्यांच्या कररुपाने मिळालेल्या पैशांची नासाडी करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.७.२ किमी लांबीचा मोराज सर्कलपर्यंतचा सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन आहे. परंतू आता पालिकेने सारसोळे जंक्शनपर्यंतचाच सायकल ट्रॅक केला जाणार असल्याचे नेरुळ कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले असले तरी संपूर्ण सायकल ट्रॅकचे काम सुरु करताना हायकोर्टाची पूर्व परवानगी का घेतली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकामाला पालिकेचे अभय ?
सायकल ट्रॅकचे काम मे. साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्या मार्फत सुरु असून वर्षभरापूर्वी या कामाचा कार्यादेश दिला असून काम पूर्ण करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत आहे. परंतू याच पामबीच मार्गाला समांतर जाणाऱ्या सायकल ट्रॅकमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांची रुंदीही अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे. मुळातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याचा पाईपलाईनवरुन सायकल ट्रॅक जाणे कितपत योग्य आहे याचा खुलासा शहर अभियंत्यांनीच करायला हवा. ११.५८ कोटी खर्चाच्या या कामात वस्तुस्थितीजन्य नकाशे बनवणे, सायकल ट्रॅक बनवणे, ब्रीज व क्रॉसिंग बांधणे फ्लोरिंग करणे,रोलिंग बसवणे असे अनेक कामे आहेत. परंतू पालिकेने हव्या त्या पध्दतीने सायकल ट्रॅक वळवल्याचे पाहायला मिळत आहे. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील समुद्राचे पाणी पुन्हा ज्वेलकडे येते त्या ठिकाणी पालिकेची पाण्याची पाईपलाईन जात असल्याने हा सायकल ट्रॅक जक्क पामबीच मार्गालगत येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे एकीकडे पालिकेने कोणतेच झाड या प्रकल्पात तोडले जाणार नसल्याचे सांगताना दुसरीकडे या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात ३ पट झाडे लावण्याचे पत्र का दिले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कमी अधिक रुंदीच्या सायकल ट्रॅकमुळे ठेकेदाराला बिल देताना पुन्हा सायकल ट्रॅकच्या रुंदीचे मोजमाप होणार का असा प्रश्न निर्माण केला जात आहे. तर नेरुळ भागात सायकलवर बसून सायकल चालवली तर डोक्याला झाडे लागतील असा प्रकार आहे.त्यामुळे संपूर्ण कामाबाबतच प्रश्नचिन्ह असल्याचे मत शहरप्रमुख विजय माने यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण; सोमवारी देवगडच्या ३०० पेट्या दाखल
अनियमितता आढळल्यास चौकशी करुन कारवाई करणार
सायकल ट्रॅकच्या वादाबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासमवेत शहरप्रमुख विजय माने व पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतू आयुक्तांनी शिष्टमंडळाला भेट देत सायकल ट्रॅकच्या कामात अनियमितता आढळल्यास योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
पालिकेमध्ये प्रशासकांचा कारभार सुरु असताना अनेक कामे काढून लोकप्रतिनींधींचे नियंत्रण नसल्याने मनमानी पध्दतीने अनावश्यक काम करण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. ज्या ठिकाणाहून शहराला पाणीपुरवठा करणारी प्रतिभाची पाईलाईन गेली आहे.त्याच मार्गाने सायकल ट्रॅक नेण्याचा प्रकारही झालेला आहे.त्यामुळे पालिका आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी समीर बागवान यांनी केली आहे.