नवी मुंबई : स्वतःच्या जमिनीचा व्यवहार दोन कंपनी सोबत केला असताना त्याच जमिनीचा व्यवहार सिडकोशी करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल जिल्हाध्यक्ष  शिरीष घरत यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. . 

शिरीष घरत यांची २५ गुंठे जमीन ( जुना सर्वे नं. ४७४ गट नं. १७) मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोने घेतली. त्या बदल्यात अन्यत्र तेवढीच जमीन देण्याचे करारपत्रहीं सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून करण्यात आले. असे असताना हिच जमीन करारापूर्वी   मे. के. एस. श्रीया इंन्फाबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. यांना साठेखत व कुलमुखत्यारपत्र व्दारे रक्कम ७० कोटी रूपयांना विक्रि करण्यात आली होती. या व्यवहार पोटी घरत यांनी १ कोटी ९८ लाख रक्कम स्विकारली  होती. तसेच सदर भुखंडाचे संबंधितास अभिहस्तांतरीत करून त्यामध्ये नमुद दोन कंपन्यांचा त्रयस्थ पक्षकाराचा अधिकार प्रस्थापित केला. या  भूखंडाबाबत शिरीष  घरत यांचे नमूद भुखंडाबाबत अधिकार संपुष्ठात आले होते.

तरीही तो स्वत:चे अधिकारात असल्याचे खरेदीदार वर नमुद दोन कंपन्या व सिडको महामंडळास भासवुन अप्रामाणिकपणे सदर भुखंडाची ताबा पावती सिडको महामंडळला दिली व त्या मोबदल्यात स्वतःचे फायदयाकरीता समान क्षेत्राचा भुखंड क्र. १९/ ए, सेक्टर ०७, खारघर नोड, क्षेत्र २५०० चौ. मि. या भुखंडाचा ताबा घेवुन मे. के. एस. श्रीया इंन्फाबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. यांची व सिडको महामंडळाची ६० कोटी रूपयांची फसवणुक केली असल्याचे समोर आले.  त्यामुळे सिडकोने त्यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे , अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. याबाबत शिरीष घरत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

Story img Loader