पनवेल: वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वकिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या तक्रारी अर्जानंतर हा गुन्हा नोंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वकिल अमित कटारनवरे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीमध्ये आजपर्यंत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर वेळीच कार्यवाही न झाल्याने त्यांचे वादग्रस्त विधाने करण्याचे बळ वाढत असल्याचे म्हटले आहे. भिडे यांच्या बेकायदेशीर कृत्यांना वेळीचअटकाव न केल्यास राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात संपत्तीचे व मानव प्रजातीचे नुकसान होऊन दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची भिती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. भिडे यांनी ११००० तलवारधारी तरुणांचा पहारा गडावर सुवर्ण सिंहासन झाल्यावर ठेवण्यासाठी तुकडी करा असा आदेश संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांनी तरुणांना दिला आहे.
त्यामुळे तलवारधारी तरुणांचे माथे भडकावुन त्यांचा दुरुपयोग करुन राज्यात आणि देशात हिसांचार होण्याची शक्यता तक्रारीत तक्रारदारांनी वर्तविली आहे. भिडे हे गैर अनुसुचित जाती-जमीतीचे सदस्य असुन त्यांनी तथागत गौतम बुद्धाविरुद्ध अनादरयुक्त वक्तव्य करुन, मनु बाबत आदरयुक्त वक्तव्य करुन, जन समाजात एकोपा टिकण्यास बाधक असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भिडे यांची विधाने अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तक्रारदार वकिल यांनी कायद्याने भिडे यांच्यावर कोणती कलमे लागतील असा तपशील पोलीसांना लेखीतक्रारी अर्जात दिला आहे.
हेही वाचा >>>पनवेल: प्रवासात हरवलेला फोन दोन तासांत शोधला; वाचा नेमक काय घडलं…
विज्ञानाचा कुठलाही आधार नसताना आंब्यास औषधी असल्याचे जन-समाजात अफवा पसरवुन त्याबाबत निपुत्री पिडीत लोकांच्या मनात चुकीचा गैरसमज अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. भिडे यांनी अनुसुचित जाती-जमाती (अ.प्र) सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(r) (u)(V), ३(2)(va) अन्वये, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीस अधिनियम च्या तरतुदी अन्वये, अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार तसेच भादवि चे कलम १५३-अ, १५३-ब, २९५-अ अन्वये दखलपात्र गुन्हा केल्यामुळे अनुसुचित जाती-जमाती (अ प्र) नियम १९९५ सह सुधारणा नियम २०१६ चे नियम ५(१)(२)अन्वये तसेच फौजदारी प्रकीया संहितेचा कलम १५४ प्रथम खबरी अहवाल दाखल करणेबाबत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे व वरील नमुद गुन्हयास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहाय्य करणा-या विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.