नवी मुंबई : वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे यांना काही अनोळखी व्यक्तींनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सदस्य विकेश म्हात्रे यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी रात्री उलवा सेक्टर ५ येथील भाजपा कार्यालयातून अश्विन नाईक, विकेश म्हात्रे आणि वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे घरी जाण्यास निघाले होते. अश्विन हे  विकेश  यांच्या गाडीत बसले तर त्यांच्या गाडीच्या मागेच असलेल्या गाडीत अमर म्हात्रे बसत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लोखंडी गजाने अमर म्हात्रे यांना मारहाण करणे सुरू केले. हा प्रकार लक्षात येताच विकेश हे अमर यांना वाचविण्यास धावले असता दोघांनाही मारहाण सुरू केली. हे दोघे जेव्हा मारहाण करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत होते तेवढ्यात एका गाडीतून अजून काही लोक आले व त्यांनीही मारहाण सुरू केली. मारहाण करून हल्लेखोर पळून गेले. यात अमर आणि विकेश यांना जखमी अवस्थेत भारती रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. यात अमर यालाच जास्त मारले जात असल्याने सदर हल्ला अमर यांच्यावरच झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या अमर हा अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे, अशी माहिती विकेश याने दिली. 

हेही वाचा – नवी मुंबई: तळीरामांना दारू भोवली, दारुच्या नशेत बाईकची झाली चोरी…

हल्लेखोर कोण होते हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र अमर यांनी काही दिवसांपूर्वी बेकायदा कंटेनर यार्डबाबत दिलेल्या तक्रारीवरून सिडकोने कारवाई करीत संबधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. कदाचित याचाच राग मनात धरून हा प्रकार झाला असावा किंवा येत्या काही महिन्यांत निवडणूक होणार असल्याने राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला असावा. या शिवाय पाच वर्षांपूर्वी विकेश यांची गाडी अज्ञात लोकांनी जाळून टाकली होती. असे अंदाज असून नक्की कोणी हल्ला केला हे पोलीस तपासात समोर येईल, अशी माहिती विकेश याने दिली. 

हेही वाचा – नवी मुंबई: भाजीपाला बाजारात अवैधपणे कांदा बटाट्याची विक्री ?

याबाबत एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी या घटनेला दुजोरा दिला, तसेच पोलीस तपास सुरू असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against unknown persons who beat wahal deputy sarpanch and a member ssb
Show comments