नवी मुंबई: चांगला चाललेला व्यवसाय जागतिक पातळीवर नेताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोणाशी व्यवहार करतो हे जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. ट्रॅव्हल पोर्टल बनवून त्याद्वारे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय जागतिक पातळीवर करू शकतो. असे पटवून त्यासाठी पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरित मेहता आणि आकांक्षा मेहता अशी यातील आरोपींची नावे आहेत. घणसोली येथे राहणारे सागर डिडवाळ यांची फसवणूक केल्याचा मेहता दाम्पत्यावर आरोप आहे. सागर यांचा सेवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय आहे. व्यवसाय निमित्ताने त्यांची मेसर्स एरीज व्हॅकेशन प्रा.लि . चे संचालक चरित मेहता आणि आकांक्षा मेहता यांचा परिचय झाला.
हेही वाचा… विरोधकांचे मराठा प्रेम पुतना मावशी सारखे…आरक्षण देऊ शकेल ते शिंदे-फडणवीस सरकारच – दरेकर
मेहता हे स्वतःच्या ट्रॅव्हल्स कंपनीसाठी पोर्टल तयार करीत असून त्याद्वारे जगातील विविध ठिकाणच्या ट्रॅव्हल्स एजंट कडून वर्षाला निदान १०० कोटींचा व्यवसाय होईल आणि पोर्टल बनवण्याचे काम सुरु आहे त्यात तुम्ही एक कोटी गुंतवले तर ५० टक्के हिस्सा मिळेल. असा प्रस्ताव सागर यांच्या समोर ठेवला. पोर्टलचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असेही सांगितले. प्रस्ताव चांगला वाटला म्हणून सागर यांनी टप्प्या टप्प्याने एक कोटी रुपये मेहता यांच्या खात्यात भरले. दरम्यान अनेक दिवस होऊनही पोर्टलचे काम पूर्ण न झाल्याने त्यांनी गुंतवणूक परत मागितली. मात्र मेहता यांनी अजून पैशांची गरज असून पूर्वी केलेली गुंतवणूक परत मिळणार नाही असे सांगितल्याने सागर यांनी पुन्हा गुंतवणूक केली. अशा प्रकारे १५ मे २०१९ ते ५ ऑकटोम्बर २०२१ दरम्यान एकूण २ कोटी ८९ लाख ४०हजार ३७० रुपयांची गुंतवणूक केली. तरीही पोर्टल मध्ये काहीही प्रगती न झाल्याने शेवटी या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला. या प्रकरणाची शहानिशा करून मेहता दाम्पत्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.