पनवेल ः नवीन पनवेल येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांसह इतर कार्यकारीणीतील विश्वस्तांविरोधात बुधवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेल येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून रितसर चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणांना ही शैक्षणिक संस्था विनापरवानगी किंवा बनावट दस्ताऐवजांवर सुरु असल्याचे समजण्यासाठी १८ वर्षे लागली याचीच चर्चा परिसरात आहे. १८ वर्षांनंतर हे विनापरवानगीचे प्रकरण बाहेर आल्याने मागील १८ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण मिळवले असून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

२००६ ते २०२४ या दरम्यान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाने ही फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. सिडको मंडळाने नवीन पनवेल येथील सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक ४१ येथील जागा नोकरदार महिलांच्या वसतिगृहासाठी या संस्थेला दिली होती. परंतु शिक्षण संस्थाचालकांनी या भूखंडाचे बनावट दस्त बनवून हा भूखंड शिक्षण संस्थेसाठी खरेदी केल्याचे भासवले. तसेच त्यावर महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थेचे कामकाज सुरु केले. तसेच ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाने देवद येथील जागा धनराज विस्पुते यांच्या नावावर असताना ती जागा ऋषिकेश शिक्षण संस्थेच्या नावावर दाखवून शिक्षण विभागासमोर मान्यता घेताना बनावट जागेचे कागदपत्र दाखविण्यात आले. त्यानंतर त्या जागेवरसुद्धा विविध शैक्षणिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फार्मसी महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, सीबीएसस्सी अशा वेगवेगळ्या शैक्षणिक विभाग सुरु केले. येथील शाळेच्या इमारत बांधकामासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सरकारी यंत्रणांची कायदेशीर परवानगी घेतली नाही. त्यामुळे केंद्रीय व राज्यातील शिक्षण विभाग व इतर सरकारी विभागांच्या परवानगीविना जागेचा वापर आणि शैक्षणिक संस्था चालविल्यामुळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा – नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा

हेही वाचा – द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त

या संस्थेचे अध्यक्ष धनराज विस्पुते, सचिव संगिता धनराज देविदास विस्पुते, खजिनदार परिमेला करंजकर, उपाध्यक्ष दिलीप कुमार चव्हाण, सदस्य शोभा दिलीप चव्हाण, महिंद्र देविदास विस्पुते, स्मिता महिंद्र विस्पुते, रमेश आत्माराम विस्पुते, वंदना विजय बिरारी, राकेश चंद्रकांत सोनार, मनोज दुर्गादास सोनार, प्रशांत भामरे, विक्रम धुमाळ या विश्वस्तांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त बनवून सरकारी कार्यालयांची फसवणूक करणे व त्यासाठी कट रचणे याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Story img Loader