पनवेल: कळंबोलीतील प्रियकराने प्रियसीची हत्या केल्यानंतर केलेल्या आत्महत्या प्रकरणातील अनेक कंगोरे महिन्याभरानंतर उजेडात येत आहेत. १२ डिसेंबरला प्रियकराचा मृतदेह नेरुळ जुईनगरच्या रेल्वेरुळावर सापडला. मात्र महिन्याभरात खारघरच्या डोंगररांगात प्रियसीचा मृतदेह सापडू शकला नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी मृतावस्थेत १९ वर्षीय वैष्णवी हीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर कळंबोली पोलीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून वैष्णवी हीची मृत प्रियकर वैभव बुरुंगले याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बेपत्ता वैष्णवीचा मृतदेह पोलीसांना शोधायला लागलेला विलंब हा आधुनिक पोलीसांच्या तपास यंत्रणेविषयी साशंकता निर्माण करणारा ठरला आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळंबोलीतील दुहेरी हत्याकांडाच्या गंभीर प्रकरणाने अनेक प्रश्न नवी मुंबई पोलीसांच्या तपास यंत्रणेविषयी उभे केले आहेत. हत्या झालेल्या वैष्णवीचा मृतदेह शोधण्यासाठी इतके दिवस का लागले. नवी मुंबई पोलीसांच्या विशेष पथकाची स्थापना केली नसती तर अजून काही महिन्यात वैष्णवीचा मृतदेह त्याच ठिकाणी जमिनदोस्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक कळंबोली पोलीस ठाण्यात मृत वैष्णवी हीच्या वडीलांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या फीर्यादीमध्ये ते स्वता कळंबोलीतील एका शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करतात. एक १३ वर्षांचा मुलगा आणि मुलगी वैष्णवीसह पत्नी असे हे कुटूंबिय सेक्टर ३ येथील एलआयजी येथे भाड्याच्या घरात राहतात. वैष्णवी ही सुधागड महाविद्यालयात शिकत असताना तीचे वैभव बुरुंगले याच्यासोबत प्रेम झाले. वैष्णवी ही त्यानंतर बीएसस्सी डेटा सायन्स या पुढील शिक्षणासाठी मुंबई (शीव) एसआयएस महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. ऑक्टोबर महिन्यात वैभव आणि वैष्णवी यांच्यातील प्रेम असल्याची बातमी वैष्णवी हीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी काही नातेवाईकांसह वैभव याच्या घरी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. वैभव हा कळंबोलीतील सेक्टर १६ येथील हंसध्वनी या सोसायटीत राहत होता. यापुढे वैष्णवी हीच्यासोबत कोणतेही संबंध ठेऊ नये अशी समज वैभवला दिल्यापासून वैष्णवी हीने कुटूंबियांचे एेकत वैभवशी भेटणे सोडले. १२ डिसेंबरला वैष्णवी हीने वडिलांना फोनकरुन दुपारी सव्वादोन वाजता महाविद्यालय सूटले असून घरी येत असल्याचे सांगीतले. मात्र दुपारी साडेतीन वाजता वैष्णवीसोबत मोबाईलवर संपर्क होत नसल्याचे वडीलांनी पोलीसांना सांगीतले. चार वाजल्यानंतर वैष्णवीचा मोबाईल फोन बंद झाला होता. नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर शोध घेतल्यानंतर वैष्णवीच्या पालकांनी रात्री १० वाजता कळंबोली पोलीस ठाण्यात वैष्णवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. त्याचदिवशी वैभवच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कळंबोली पोलीसांत दिली. रात्री साडेदहा वाजता वैष्णवीच्या पालकांना वैभवने सानपाडा ते जुईनगर रेल्वेरुळाखाली आत्महत्या केल्याचे समजले. दूस-या दिवसापासून पोलीसांचा तपास सूरु झाला. वैष्णवी हीच्या मोबाईल फोनच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती तसेच विविध रेल्वेस्थानकांच्या सीसीटिव्ही कॅमराच्या मदतीने वैष्णवीचा शोध घेतल्यानंतर तीचा मोबाईल फोन खारघर ओवेकॅम्प येथील मोबाईल टॉवरच्या अखेरचा संपर्कात असल्याचा आढळला. तसेच वैभव आणि वैष्णवी हे दोघेही जीटीबी नगर रेल्वेस्थानकातून नवी मुंबईकडे १२ डिसेंबरला सकाळी ११ वाजून ३५ जात असल्याचे दिसले.

हेही वाचा >>>सुरुवातीलाच गैरसोयींचा सामना; उरण ते नेरुळ-बेलापूरदरम्यानच्या स्थानकांवरील वीज खंडीत होण्याचे प्रकार

दुपारी पावणेएक वाजता हे दोघेही खारघरकडून ओवेकॅम्पकडे जाताना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाल्याचे पोलीसांना दिसले. मात्र सायंकाळी ३ वाजून ३९ मिनिटांनी वैभव एकटाच खारघर स्थानकात परतला. त्याच्यासोबत वैष्णवी नव्हती असेही कॅमेरात टिपले गेले. पोलीस आणि वैष्णवीच्या नातेवाईकांनी त्यानंतर खारघरच्या डोंगररांगा पिंजुन काढल्याचे सांगीतले जाते. मात्र तरीही वैष्णवीचा शोध लागला नाही. वैभवने आत्महत्या करण्यापुर्वी त्याच्या मोबाईलमध्ये मरणापुर्वी एक पत्र लिहीले होते. यामध्ये “आता मी गप्प बसु शकत नाही, ज्या पोरीमुळे मला एवढा त्रास झाला, समजा ती जर वाचली तर तर तिला सोडू नका, ती जर वाचली तर मला न्याय मिळवुन दया हिच अपेक्षा’ तसेच ‘मी आता हे जिवन संपतोय आणि जिने मला धोका दिला. माझ्या वैष्णवीला पण मी सोबत घेवुन जाणार, जर ती वाचली तर मला न्याय दया.  ‘मी आणि वैष्णवीने ७ फेरे पण घेतलेले आणि मी सिंदुर पण लावलेला तिला आणि अस फसवुण गेली हे कोणालास सहन होणार नाही माझी जिंदगी बरबाद केली म्हणुनच मी आता टोकाच पाउल उचलतोय” असे लिहुन ठेवले होते.  मात्र त्यानंतर वैष्णवीचा शोध पोलीस लावू शकले नाही. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे गेल्यानंतर या तपासाला चालना मिळाली. ट्रेकर्स पथक, ड्रोन कॅमेरा, वन विभाग यांच्या सहकार्याने १६ जानेवारीला सकाळी पावणे नऊ वाजता वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्याशेजारी  शर्ट, गळयात असणारा पडलेले घडयाळ व पॅन्ट तसेच  महाविद्यालयाचे ओळखपत्र पाहून पालकांनी तीला ओळखले. वैभवने मरणापूर्वी लिहिलेल्या मोबाईलमधील नोटमध्ये LO1-501 असे सांकेतिक शब्द लिहीले होते. ज्या ठिकाणी त्याने वैष्णवीचा गळा आवळून ठार केले. त्याच जागेवर वन विभागाने लावलेल्या वृक्षरोपनावर हा नंबर लिहिला होता. मात्र तपास करणा-या पोलीसांना ही आधुनिक सांकेतिक भाषेचा उलगडा होण्यास वेळ लागला. वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचे नियोजन पहिल्यापासून करुन ठेवले होते. वैभवच्या अनेक विनवनी नंतर शेवटची भेट वैष्णवीच्या जिवावर बेतली. गळा आवळताना वैभवने ‘पिल्लू तूला थोडा त्रास होईल सहन कर, आपण पुढील जन्मात प्रवेश करु असे बोलल्याचे त्याच्या मोबाईलमध्ये रेकोर्ड केले आहे. १२ डिसेंबर ते ६ जानेवारी या दरम्यान कळंबोली पोलीसांंनी पारंपारीक पद्धतीने तपास केला. त्यामुळे या प्रकरणातील मृतदेह सापडण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case of murder has been registered on the body of the lover who killed the beloved amy