पनवेल : २५ मेट्रीक टन हायड्रोजन पेरॉक्साइड ड्रमने भरलेला टँकर मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडे फाटा येथे मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता कलंडला. टँकर कलंडल्यानंतर त्यातून धूर येऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली. नावडे फाटा येथे महामार्गालगत शाळा असल्याने पोलिसांनी तातडीने नावडे फाटा ते रोडपाली जंक्शन या दरम्यानची रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली.
मुंब्रा पनवेल ही वाहतूक थेट उड्डाण पुलावरून सुरू होती. टँकर कलंडल्यानंतर संबंधित टँकरचा चालक हा टँकरमध्ये अडकल्यामुळे या महामार्गावरील प्रवाशांनी टँकरची काच फोडून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. तळोजा पोलीस ठाणे तळोजा वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पसरलेले हायड्रोजन पॅरॉक्साईड रसायनावर पाणी मारून रस्ता स्वच्छ केला.
टँकर चालकाने दिलेल्या माहितीनुसार कल्याण येथील नॅशनल परॉक्साईड या कंपनीचा माल जेएनपीटी बंदरात घेऊन जात असताना हा अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने वळसा घेत असताना टँकर कलंडल्याचे टँकर चालकाने सांगितले. अग्निशमन दलाचे अधिकारी बी. जी. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हायड्रोजन पेरॉक्साइड या रसायनाला आग लागल्यास त्याचा अधिक मोठा भडका होऊ शकतो, तसेच शाळा शेजारी असल्यामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून शाळेच्या व्यवस्थापनाला संबंधित अपघाताची माहिती देण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी काळे यांनी सांगितले.