नवी मुंबई: कुठल्याही सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती अधिकार संबंधित अधिकाऱ्यांची नावे व इतर माहिती लिहणे बंधनकारक असते. मात्र नवी मुंबई वाहतूक कार्यालयाबाहेर अशी कुठलीही माहिती वा अधिकाऱ्यांची नावे नाहीत. याबाबत एका नागरिकाने विचारणा केली असता निधी नसल्याचे कारण दिल्याने त्या नागरिकाने आज भीक मांगो आंदोलन केले.
भगवान सिंग ठाकूर असे त्या आंदोलकाचे नाव आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. सरकारी कार्यालयाबाहेर माहिती अधिकाराबाबत फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र कोकण भवन मधील नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त प्रशासन कार्यालयाबाहेर असा कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही. याबाबत विचारणा केली असता निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले.
हेही वाचा… मेथी पाठोपाठ कोथिंबीर ही वधारली; घाऊक मध्ये प्रतिजुडी २०-२५ रुपये तर किरकोळीत ३०-४० रुपये
नागरिकांना उपयुक्त माहितीचा फलक नसल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे निधीसाठी मी भीक मांगो आंदोलन केले. यातून जमा होणाऱ्या पैशातून फलक लावावा जेणेकरून नागरिकांची अडचण होणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. याबाबत वाहतूक पोलीस विभागाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.