नवी मुंबई : नवसारी कडून मुलुंड कडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक झाल्याने हा कंटेनर चार गाड्या आणि एका रिक्षाला धडकला. यात रिक्षातील एक प्रवासी महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात ठाणे बेलापूर मार्गावरील रबाळे अंडरबायपास येथे झाला आहे. अपघातामुळे पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती.
नवसारी येथून मुलुंड येथे सिमेंट घेऊन एक कंटेनर जात होता.साडेबाराच्या सुमारास रबाळे एमआयडीसीतुन ऐरोलीच्या दिशेने जाताना अंडरपासच्या ऐन उतारावर या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर एकदम सुसाट खालच्या दिशेने जात असल्याने कंटेनर चालकाने पदपथावर कंटेनर चढवला मात्र तरीही कंटेनर वर नियंत्रण न राहिल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या असलेल्या ५ गाड्यांना कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये आर्टिगा, रिक्षा, टेम्पो, होंडासिटी व महिंद्रा एक्स यु व्ही अशा ५ गाड्यांना जोरात धडक दिल्याने या गाड्यांचे भरपूर नुकसान झाले आहे.
हेही वाचा >>>उरण परिसरात विजेचा लपंडाव; तारा तुटण्याच्या,खांब कोसळण्याच्या घटनांत वाढ
रिक्षा तर पूर्णपणे चेपली गेली असून यातील एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे, तर या जखमी महिलेला रिक्षातून बाहेर काढताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस उपस्थित होते. अपघात वेळी वाहतूक कोंडी झाली मात्र या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित असल्याने फार वेळ वाहतूक कोंडी झाली नाही. अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी दिली.