रस्त्यावरील शुल्लक कारणावरुन सुरु झालेला वाद मारामारीपर्यंत पोहोचल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोळी वसाहतीत घडली आहे. या मारामारीत दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबियांचा सहभाग होता. या प्रकरणी कळंबोळी पोलीस स्थानकात दोन्ही कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा- विद्यार्थीनीचा मोबाईल लंपास, सिंघम पोलिसांनी पाच मिनीटांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १६ मधील आशा नर्सिंग होम या रुग्णालयासमोर रविवारी सका़ळी साडेअकरा वाजता अरुंद रस्त्यावर या भांडणाची सुरुवात झाली. दोन चारचाकी वाहने एकाचवेळी रस्त्यावरुन येजा करु शकत नसल्याने गाडी मागे घेण्यावरुन वाद सूरु झाला. रोडपाली गावातील रहिवाशी विक्रम ठाकूर हे फळे खरेदी करण्यासाठी बाजारात चारचाकी घेऊन आले होते. यावेळी सेक्टर १६ मधील साकेतधाम सोसायटीत राहणार २२ वर्षीय दिवेश पुजारी यांचीही चारचाकी गाडी याच रस्त्यावरुन जात होती. गाडी काढण्यावरुन वाद झाल्याने दिवेश याने विक्रम यांच्या नाकावर, डोळ्यावर आणि चेह-यावर बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दिवेश घरी गाडी घेऊन निघून गेला.

हेही वाचा- उरण पनवेल मधील मच्छिमारांना मिळणार ९५ कोटींची नुकसानभरपाई ?

या दरम्यान विक्रमने दिवेशच्या गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून या घटनेची माहिती गावातील त्याच्या कुटूंबियांना दिली. विक्रम दिवेशच्या गाडीचा पाठलाग करत राहीला. काही मिनिटात दिवेश साकेतधाम सोसायटीत घरी गेला. विक्रम याचे ठाकूर कुटूंबिय तोपर्यंत साकेतधाम सोसायटीत पोहचले होते. काही मिनिटांत दिवेश याचे आईवडील आणि ठाकूर कुटूंबियांमध्ये हाणामारी झाली. दिवेशची आई विक्रमच्या हाताला चावली. तर २२ वर्षीय कुणाल ठाकूर याला दिवेशच्या कुत्र्याने चावा घेतला. या भांडणात अरुण व किरण ठाकूर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचे पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुजारी कुटुबियांनी सुद्धा ठाकूर कुटूंबियांनी घरात शिरुन मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोन्ही कुटूंबियांची तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.