नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील मसाला बाजार आवारातील एच २३ या सुक्या मेव्याच्या दुकानाला सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या गाळ्याच्यावरच्या भागात काजू, बदाम ,अक्रोड, पिस्ता असा सुक्या मेव्याचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला १४-१६तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
एपीएमसी मसाला बाजारात अक्रोड, काजू ,बदाम, पिस्ता ,खजूर इत्यादी सह मोठ्या प्रमाणात गरम मसाल्याचे दुकाने आहेत. सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजता मसाला बाजारातील एच २३ या सुक्या मेव्याच्या गाळ्याला भीषण आग लागली. आगीची घटना समाजताच वाशी अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात अक्रोड, काजू आणि बदाम तसेच पॅकिंगचे प्लास्टिक साहित्य असल्याने आग अधिक भडकली होती. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा… अॅप वरुन कर्ज घेणे पडले भलतेच महागात, महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल, दोन कुटुंबियांना झाला मनस्ताप
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल १५ ते १६ तास लागले असून याठिकाणी तब्बल पाण्याचे ३०-३५ टँकर लागले आहेत. आग विझविल्यानंतर ही मोठ्या प्रमाणात अक्रोड आणि बदाम असल्याने आग सोमवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मसाला बाजारात सुका मेव्याच्या दुकानात लागलेल्या आगीबाबत पहाटे साडेतीनच्या सुमारास कॉल आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अक्रोड ,काजू, बदाम असल्याने आग विझविण्यासाठी १५-१६तास लागले. तसेच ३०-३५टँकर पाण्याचा मारा करावा लागला. याठिकाणी तोकडी जागा असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अडचणी आल्या. – पुरुषोत्तम जाधव, विभागीय अग्निशमन अधिकारी, वाशी