उरण: जेएनपीए बंदर कामगार वसाहतीत सेक्टर २ मधील सेंट मेरी विद्यालयाच्या आवारातील उघड्या वीज वहिनीला शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग जेएनपीएच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझवली. रात्रीच्या सुमारास आग लागल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
वसाहतीतील इंग्रजी माध्यमाच्या या विद्यालयात १० वी पर्यंत चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आवारात खड्डे खोदून वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. याच कामाच्या ठिकाणी ही आग लागली. खोदलेल्या खड्ड्यात उघड्या वीज वहिनीला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वालाही उंचीवर दिसु लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. शाळा सुरू असताना आगीची घटना घडली असती तर अशी भीती पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… सहाशे रुपयांसाठी खून, पनवेलमधील घटना
दरम्यान शार्ट सर्किटमुळे आगीची शक्यता व्यक्त करतानाच या आगीत शाळेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती जेएनपीए कामगार विश्वस्त रविंद्र पाटील यांनी दिली. तसेच या संदर्भात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती न्हावा -शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.