नवी मुंबई : एमआयडीसी भागातील चुना भट्टी एस आर क्वारी प्लांट नजीकच्या डोंगर परिसरात आज दुपारी दिडच्या सुमारास आग लागली. उन्हाळा सुरू असल्याने वाळलेल्या गवताने पेट घेतला आणि काही वेळातच आग वाढत गेली. या आगीत अनेक झाडे जळून गेली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. ही जागा एमआयडीसी प्रशासनाच्या अखत्यारीत येत असून वन संपदा असल्याने भूखंड विक्री होऊ शकत नाही.

VIDEO >>

भूखंड माफिया घटकांनी हा प्रकार घडवून आणला असावा असा दावा पर्यावरण सेवाभावी संस्थेचे बाळासाहेब शिंदे यांनी केला. आग लागताच परिसरात धुराचे लोट पसरले व उष्णताही प्रचंड जाणवू लागली. आगीचे लोट आणि धूर दिसताच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांनी धाव घेतली. आग लावली असल्याचा संशय व्यक्त करीत माहिती देऊनही अग्निशमन दल अर्धा पाऊण तास उशिरा आल्याचा आरोप केला. तसेच आगीची चौकशी व्हावी अशी मागणी कोटीवाले यांनी केली.

Story img Loader