नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील बोकडविरा स्थानक आणि द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्ग ते द्रोणागिरी नोडमधील अंतर कमी होणार आहे.
उरण ते नेरूळ मार्गावरील खारकोपरपर्यंत रेल्वे मार्ग सुरू झाला आहे. मात्र यातील गव्हाण ते उरण हा १४ किलोमीटरचा मार्ग रखडला आहे. या मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी दिल्लीतून प्रधानमंत्री कार्यालयातून पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मार्गातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. परिणामी उर्वरित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. यामध्ये रेल्वे रूळ तसेच स्थानकांची कामे ही सुरू आहेत. यातील बोकडविरा वायू विद्युत केंद्र कामगार वसाहत ते वायू विद्युत केंद्र येथील रेल्वे मार्गावर सिडको कडून उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.