नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली सेक्टर ३ येथे एका बॅगेत चार दिवसांची मुलगी आढळून आली आहे . हि माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सदर मुलीला ताब्यात घेत रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. सध्या हि चिमुरडी एका बाळ आश्रमात सोडण्यात आली आहे. हि घटना २२ सप्टेंबरला घडली असून पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घणसोली सेक्टर ३ येथील एका इमारतीत लक्ष्मी रुग्णालय आणि वन लाईट फिटनेस सेंटर दरम्यान एका ठिकाणी बेवारस अवस्थेत असलेल्या बॅगेतून एका तान्ह्या मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. सुरवातीला कुठून आवाज येतोय हे समजले नाही मात्र व्यवस्थित ऐकले असता बॅगेतून आवाज येत असल्याचे उपस्थित लोकांच्या लक्षात आले.
त्यांनी बॅग उघडून पहिले असता आत तीन ते चार दिवसांची मुलगी आढळून आली. या बाबत पोलिसांना माहिती मिळतातच घटनास्थळी येत पोलिसांनी मुलगी ताब्यात घेत वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णलयात दाखल केले. तिची तपासणी केली असता बाळ सुद्रुड असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या मुलीला नेरुळ येथील विश्व बालक केंद्र येथे ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक युवक चेहऱ्याला कपडा बांधून मुलगी असलेली बॅग एका ठिकाणी ठेऊन निघून जात असल्याचे आढळून आले. या बाबत तपास सुरु आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.