पनवेल : माथेरानच्या मंकी पॉईंटच्या डोंगररांगांमधील काही भाग खचण्याचा आवाज मंगळवार दुपारपासून येत असल्याने पनवेल तालुक्यातील धोदाणी गावातील ग्रामस्थांना सरकारी प्रशासनाने मंगळवारी रात्री भेट देऊन सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे माथेरानच्या डोंगरांमधील माती खचून पनवेलबाजूकडील ओढ्यांमध्ये येत आहे. मंगळवारी दुपारपासून काही तास डोंगर खचत असल्याचा मोठा आवाज काही तास सूरु असल्याने या डोंगरालगतच्या धोदाणी गावातील ग्रामस्थांमध्ये एकच घबराट पसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळपर्यंत या गावात पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील, तहसिलदार विजय पाटील यांनी गावक-यांची भेट घेतली. महसूल विभागाच्या कर्मचा-यांनी प्रत्यक्ष कुठून आवाज आला याची माहिती घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र रात्र झाल्याने ही मोहीम थांबविण्यात आली. तोपर्यंत इतर गावक-यांनी धोदाणी गावाला मदत करण्यासाठी धाव घेतली होती. भितीपोटी डोंगरांगालगत राहणा-या घरांमधील ग्रामस्थांनी रात्री सूरक्षित असलेल्या नातेवाईकांच्या घरी राहण्याची सोय केली.

हेही वाचा… कळंबोलीकर १८ तास वीजेविना

उपविभागीय अधिकारी मुंडके यांनी ग्रामस्थांना भिती आणि अफवेपोटी पळापळ न करण्याचा सल्ला दिला. दरडप्रवण क्षेत्रात एकाच वेळी सर्वांना संपर्क साधला जाईल अशी यंत्रणा येथे तातडीने कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामस्थांनी पोलीस व महसूल विभागाला संपर्क केल्यास काही मिनिटात सरकारी मदत केली जाईल असेही सांगीतले. पावसाच्या सातत्यामुळे माथेरान डोंगरातील माती पनवेलच्या दिशांमधील ओढ्यांमध्ये जाऊन पाण्याचा रंग लाल भडक होत आहे. त्यामुळे गाढी नदीच्या पाण्याचा रंग लाल होत असल्याने नदीकाठच्या गावांमधील राहणारे ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई: हलक्या वाहनांनी पर्यायी मार्ग पाम बीचचा वापर करावा, शीव-पनवेल मार्गावर खड्डेच खड्डे

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना बुधवारी सकाळपासून पोलीस व महसूल विभागाचे एक पथक येथे माहिती घेण्यासाठी येणार असून ग्रामस्थांना न घाबरण्याचे आवाहन मंगळवारी रात्री केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A landslide near monkey point of matheran unrest among people of dodhani village panvel asj
Show comments