घरातील वृद्ध महिलेच्या अधूपणाचा गैरफायदा घेत घरकाम करणाऱ्या महिलेनेच ३ लाख ३० हजाराचे दागिने चोरल्याची घटना नवी मुंबईतील कामोठे परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या ४८ तासात गुन्ह्याची उकल करुन मोलकरणीला अटक केली आहे. संकिता जाधव असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी मोलकरणीकडून चोरी केलेले सगळे दागिने ताब्यात घेतले आहेत.
हेही वाचा- पनवेलच्या खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका
घरकाम करण्यास ठेवण्यात येणारी मोलकरीण अथवा नोकराची पूर्ण माहिती फोटोजवळ ठेवण्याविषयी पोलीस नेहमीच सूचना करीत असतात. मात्र या सूचनेकडे फारसे गांभीर्याने पहिले जात नाही. अशीच घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कामोठे येथे घडली. कामोठे सेक्टर १९ येथील सत्यम हाईट्स येथे कुलविंदर सिंग राहतात. घराची दुरुस्ती सुरु असल्याने ते दुबई येथे स्थायिक झालेल्या आपल्या बहिणीच्या कामोठे येथीलच रिकाम्या सदनिकेत राहण्यास गेले. सोबत त्यांनी घरकाम करणारी संकिता जाधव हिलाही नेले. कुलविंदर सिंग यांची आई वृद्ध असून चालण्यास खूप त्रास होत असल्याने शक्यतो त्या एकाच ठिकाणी बसून असतात. याचाच गैरफायदा घेत संकिता हिने ३ लाख ३० हजाराचे दागिने चोरी केले.
हेही वाचा- उरणमध्ये गोवरचा संशयित रुग्ण
काही दिवसांनी तिने काम सोडले. दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी सहज पाहणी केली असता कपाटातील ३ लाख ३० हजार रुपयांचे दागिने आढळून आलेच नाहीत. त्यामुळे कुलविंदर सिंग यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गेला. ही चोरी ३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तसेच संकिता हिच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखाही समांतर करत होती. संचिता हिचा शोध लागल्यावर २९ नोव्हेंबरला तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले गेले. त्यावेळी शिताफीने चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला व दागिनेही पोलिसांच्या सुपूर्त केले. या गुन्ह्यात चोरी गेलेला १०० टक्के ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीचा गुन्हा नोंद केल्यावर ४८ तासात उकल झाली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिली