सासरच्या जाचाला कंटाळून कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलासह ७ व्या मजल्यावरून उडी मारली. यात तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचा ५ वर्षीय मुलगा वाचला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पतीस अटक करण्यात आली असून लवकरच नणंद आणि सासू यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
आरती विजय मल्होत्रा असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे तर आर्वीक असे तिच्या मुलाचे नाव आहे. मयत आरतीचा भाऊ विशाल शर्मा याने तिचा पती विजय सासू किरण नणंद अंजली हिच्या विरोधात छळवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विवाह जमवणाऱ्या साईट वरून माहिती घेत आरतीचा विवाह विजय याच्याशी ठरला होता आणि ३० जानेवारी २०१६ ला विवाह धुमधडाक्यात एका हॉटेल मध्ये करण्यात आला. आरती आपले पती सासू, सासरे नणंद यांच्या समवेत न्यू रावेची अपार्टमेंट सेक्टर २० कोपरखैरणे येथे राहत होती. सुरवातीचे काही दिवस चांगले गेल्या नंतर सासू नणंद व पती तिघांनी तिला मानसिक त्रास देण्यास सुरवात केली होती. माहेरच्यांशी संबंध ठेवण्यास मनाई करणे, तिचा फोनही रिचार्ज न करणे, छोट्या छोट्या गोष्टीत वाद घालणे, माहेरचे लोक आले तर अपमानित करणे ,सणवार असताना त्यांनी दिलेल्या भेट वस्तू न स्वीकारणे असे प्रकार वारंवार होत होते.
हेही वाचा: उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान
सुमारे एक वर्षापूर्वी चणे जास्त शिजले म्हणून घरात प्रचंड भांडण झाल्याने तिने गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळीही भाऊ विशाल शर्मा याने सर्वांची समजूत काढली होती. दरम्यान २०१७ मध्ये आरतीला मुलगा झाला. निदान आता तरी सासुरवास संपेल अशी आशा होती. मात्र त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे विवाहाच्या वेळी ६५ किलो वजन असलेल्या आरतीचे वजन ३५ किलोवर आले होते असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अशाच त्रासाला कंटाळून तिने पाच वर्षाच्या आर्वीक याला कवेत घेत सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुदैवाने यात आर्वीकला वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला. मात्र आरतीचा मृत्यू झाला.
हेही वाचा: नवी मुंबईत दीड लाखांची ई-सिगारेट पोलिसांकडून जप्त; बंदी असूनही मागणीत वाढ
आरतीचा मृत्यू झाला असून तिच्या मुलाचे तब्येत चांगली होत आहे. या प्रकरणी आरतीचे पती विजय याला मंगळवारी उशिरा अटक करण्यात आली आहे तर सासू आणि नणंद यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. -अजय भोसले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे