पनवेल : सिडको महामंडळाची मागील सात दिवसांपासून राडारोडा अवैधरित्या टाकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असून बुधवारी खारघर येथे रात्री ३३ वर्षीय मंगेश पहुरकर या डम्पर चालकाला राडारोडाने भरलेला ट्रक खाली करताना सिडकोच्या पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदविला आहे.
सिडको मंडळाने सध्या राडारोडा टाकणाऱ्या डम्पर वाहनांना पकडण्यासाठी दिवसरात्र मोहीम हाती घेतली आहे. मागील ६ दिवसांत १३ डम्पर जप्त करून १७ जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत. यामुळे राडारोड्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे सिडकोच्या कारवाईमुळे दणाणले आहेत.
हेही वाचा – उरण-पनवेल मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद होणार, पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार
अद्याप मुंबईतून मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकणाऱ्या टोळीचा शोध नवी मुंबई पोलीस लावू शकले नाहीत. हा राडारोडा मुंबईमधील जमिनीवर रिकामा केल्यास तेथील महापालिका प्रशासन कठोर कारवाई करत असल्याने राडारोडा टाकणाऱ्या टोळीने नवी मुंबईचा रस्त्याकडेचा निर्जन परिसर निवडला आहे.
हेही वाचा – कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार
सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या आदेशानंतर सिडकोचे दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या विविध विभागांची कृती दल स्थापन केली. याच वेगवेगळ्या दलाने मागील ७ दिवसात १४ डम्पर जप्त करून १८ जणांवर कारवाई केली. सिडको मंडळाने डम्पर चालकांवर विविध पोलीस ठाण्यात भा.दं. वि. सं.क. २६९, ५११ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. तसेच राडारोडा अवैधरित्या टाकणारे व्यक्ती दिसल्यास रहिवाशांनी www. cideo. maharashrta. gov. in या संकेतस्थळावर संपर्क साधण्यचे आवाहन केले आहे.