पनवेल मुंब्रा महामार्गावरील खुटारी गावानजीक ऋतिका बार अॅण्ड रेस्ट्रॉरेन्ट बारमध्ये पोलीस उपनिरिक्षकाने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मंगळवारी मध्यरात्री बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. नरेंद्र पाटील असे या पोलीस उपनिरिक्षकाची नाव आहे. तळोजा पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : अखेर ‘त्या’ वादग्रस्त अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई
रात्रीचे साडेबारा वाजल्याने खुटारी गावानजीक असणा-या ऋतिका बार अॅण्ड रेस्टॉरेन्ट या हॉटेलचे व्यवस्थापक संदीप पाटील यांनी जेवत असलेल्या ग्राहकांना हॉटेल बंद करण्याची वेळ झाली असून लवकर जेवण आटपा, असे निवेदन केले. वेटर हाच संदेश घेऊन अनेक ग्राहकांना सांगत होते. या दरम्यान या हॉटेलमध्ये जेवत असलेले पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र पाटील यांच्यापर्यंत वेटरने संदेश दिल्यावर वेटर आणि पोलीस उपनिरिक्षक पाटील यांच्यात वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी हॉटेलचे व्यवस्थापक संदीप हे टेबलजवळ गेले. मात्र उपनिरिक्षक नरेंद्र यांचा चढलेला आवाज पाहून त्यांनी चढ्या आवाजात बोलू नका हॉटेल बंद झाल्याचे उपनिरिक्षकाला सांगीतले. याचा राग आल्याने उपनिरिक्षक नरेंद्र यांनी संदीप यांना कानाखाली मारली. यामुळे वेटर विरुद्ध उपनिरिक्षक नरेंद्र यांच्यात मारहाण झाली. उपनिरिक्षक नरेंद्र यांनी शेजारील एका लाकडी काठीने संदीप यांच्या डोक्यात, पोटावर, पाठीवर मारहाण केली. जखमी झालेल्या संदीप यांनी तळोजा पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक नरेंद्र पाटील यांच्याविरोधात रितसर गुन्हा नोंदविला.
हेही वाचा- पनवेल : श्वान सांभाळ केंद्रात श्वनाचा मृत्यूमुळे व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना नागरिकांशी संवाद साधा त्यांच्याशी सौजन्याने वागा असा सल्ला दिला आहे. नागरिकांशी गैरवर्तन करणा-यांना आणि शिस्तभंगांप्रकरणी आतापर्यंत पोलीसांवर आयुक्तांनी बेशिस्त कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करुन पोलीस दलाला शिस्तीच्या कारभार करण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईतून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी समज घेतील अशी अपेक्षा होती. परंतू मंगळवारी मध्यरात्री ऋतिका बारमधील उपनिरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या अंगी सौजन्या ऐवजी पोलिसी खाक्याचा अहंकार असल्याचे दिसले. पोलीस ठाण्यात याबाबत उपनिरिक्षक नरेंद्र यांच्यावर गुन्हा नोंदविला असल्याने आयुक्त याबाबत उपनिरिक्षक नरेंद्र पाटील यांच्यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलंबनाची कारवाई हाच पोलिसांचे वर्तन सूधारण्याचा पर्याय आहे का असाही सूर पोलीसदलातून व्यक्त होत आहे.