नवी मुंबई : लाच लुचपत विभागाच्या मुंबई युनिटने एन आर आय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना चार लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले. सदर कारवाई अपरात्री करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटने पूर्वी रस्त्यावर गस्त पोलिसांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या पाच पोलिसांना निलंबित केले होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचे चालले काय असा प्रश्न पडला आहे.
शहाबाज गावात एक इमारत अचानक कोसळली. सदर घटने प्रकरणी एनआरआय पोलिसांनी महेश कुंभार यांना अटक केली होती. वास्तविक कुंभार यांनी केवळ विकासक म्हणून गुंतवणूक केली होती. इमारत बांधणारे अन्य कोणी आहेत असा दावा त्यावेळी कुंभार यांच्या नातेवाईकांनी केला होता. कुंभार यांना अटक केल्यावर त्यांच्या विरोधात विविध कलमे लावून ते बाहेर येणार नाहीत, त्यांची धिंड शहाबाज गावात काढू अशी धमकी देत ५० लाखांची लाच कदम यांनी मागितली असा दावा तक्रार कर्त्यांनी केला आहे. मात्र तडजोड करीत १५ लाख ठरले. यापूर्वी २३ सप्टेंबरला १२ लाख आणि २७ सप्टेंबर रोजी २ लाख आधीच दिले होते.
हेही वाचा >>>तळोजात त्रिकुटासह २५ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
पडलेल्या इमारतीत एक महिला हेवी डिपॉझिट देऊन राहत होती. इमारत पडल्याने कुंभार यांनी तिला तिचे पैसे परत केले. हि बाब कदम यांना कळताच तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत सांगत पुन्हा १० लाखांची लाच मागितली मात्र केवळ चार लाख आहेत असे सांगितल्यावर ते पैसे देण्याचे कदम यांनी तक्रार कर्त्याला सांगितले. अशी माहिती तक्रार कर्त्याने दिली. दरम्यान याबाबत तक्रार कर्ता हे लाच लुचपत मुंबई युनिटला भेटले व सर्व हकीकत सांगितली. त्याची शहानिशा करून ८ तारखेला सापळा रचून उलवेतील घराबाहेर पैसे स्वीकारताना कदम यांना रंगे हात पकडले. अशी माहिती लाच लुचपत विभागाने दिली.