Pahalgam Terror Attack Updates Today : पनवेल – ज्याठिकाणी ही घटना घडली तेथे जाण्यासाठी घोडेस्वारी करताना पहिल्यांदा मोठा आवाज आला. त्यानंतर पुन्हा दोन मोठे आवाज आले. हा गोळीबार असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. काही समजण्यापर्यंत प्रत्यक्ष गोळीबार सुरू झाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले होते. पहेलगाममध्ये घडलेल्या गोळीबारानंतर आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. कृपया आमची मुंबईला परतीची व्यवस्था करून द्या, अशी आर्त मागणी पनवेलमधील पर्यटनासाठी गेलेले संकेत वत्सराज यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
काश्मीरमधील पहेलगामजवळ मंगळवारी झालेल्या गोळीबारात डोंबिवलीच्या तिघांना आणि पनवेलच्या देसले यांना जीव गमवावा लागला आहे. पनवेलहून काही पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते. त्यापैकी संकेत वत्सराज यांनी गोळीबाराचा थरारक घटना सांगितली. संकेत वत्सराज हे पनवेल येथे कर विषयक सल्लागार आहेत. ते सुट्ट्यांनिमित्ताने काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते.
‘मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अचानक गोळीबार झाला. त्या वेळी पर्यटक घोडेस्वारी करून टेकडीवर चढत होते. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने क्षणभर काहीच समजेनासे झाले. नंतर प्रत्यक्ष गोळीबार सुरू झाला आणि जीव वाचवण्यासाठी पर्यटकांनी झाडाझुडपांमध्ये लपण्यास सुरुवात केली. या गोंधळात १७ जणांच्या पर्यटक समूहातील १४ जण सुखरूप खाली आले. मात्र, एक महिला पडल्या. त्यांना घोडेवाल्याने वाचवले, तर त्यांच्या पतींच्या मानेला गोळी चाटून गेली. ते सध्या सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या घटनेत नवीन पनवेलचे रहिवासी दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आम्ही पूर्ण कुटुंबासह पर्यटनासाठी आलो होतो. सध्या श्रीनगरमध्ये सुरक्षित आहोत. मात्र, या अनुभवाने हादरलो आहोत. मुंबईला परतण्यासाठी विमानाचे दर ३५ हजार रुपयांहून अधिक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या परतीची व्यवस्था करून द्यावी,” अशी मागणी वत्सराज यांनी लोकसत्ताशी बोलताना केली. तात्काळ मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुढे यावे, अशी भावना अनेक अडकलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.