उरण : नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून यानिमित्ताने सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात घटस्थापनेसाठी उरणच्या नागावमध्ये मागील चार दशकांपासून शहाळ्यापासून देवीचे मुखवटे तयार करण्याची परंपरा आहे. या मुखवट्यांना रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांतील भाविकांकडून मागणी आहे.

बाजारात मिळणाऱ्या देवीच्या मुखवट्यांपेक्षा घरगुती पूजेसाठी शहाळ्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी उरणमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे मुखवटे तयार केले जातात. ही कला कमी प्रमाणात आहे. मात्र उरणच्या नागाव परिसरात गजानन नाईक हे गेल्या ४० वर्षांपासून देवीची सेवा म्हणून हे काम करीत आहेत. ८२ वर्षीय नाईक हे शहाळ्यापासून मुखवटे तयार करीत आहेत. कला येत असल्याने मित्रांनी त्यांच्याकडून असे मुखवटे तयार करून मागितले होते. त्यातूनच ही परंपरा सुरू झाल्याचे ते आवर्जून सांगतात. हे मुखवटे तयार करण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या काही दिवस अगोदरपासून तयारी करावी लागते.

हेही वाचा – नवी मुंबई : मतदार यादीतील दुबार नावे रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव

हेही वाचा – नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा

वर्षाला किमान २२ ते २५ मुखवटे ते याही वयात कलेचे एक साधक म्हणून करीत आहेत. शहाळ्याबरोबरच धातूच्या मुखवट्यांना रंगविण्याचे काम ते करतात. यासाठीचे कोणत्याही प्रकारचे दर ठरविण्यात आलेले नसून देवीचे भक्त कलेची जाण ठेवून जो मोबदला देतील तो ते घेत आहेत.